O गणेशोत्सव २०२२ – पीओपी मुर्तीस पुर्णपणे बंदी. O रेन वॉटर हार्वेस्टींगबाबत देखाव्यास मनपातर्फे आकर्षक बक्षिसे

O गणेशोत्सव २०२२ – पीओपी मुर्तीस पुर्णपणे बंदी.

O रेन वॉटर हार्वेस्टींगबाबत देखाव्यास मनपातर्फे आकर्षक बक्षिसे

चंद्रपूर ४ ऑगस्ट : यंदा महाराष्ट्रात गणेशोत्सवावरील सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. मात्र श्रीगणेशाच्या पीओपी मुर्तींवरील बंदी कायम आहे तेव्हा निर्बंध नसले तरी पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन मनपाद्वारे करण्यात येत आहे.

मागील वर्षी शहरात पीओपी मुर्ती वापरास पुर्णपणे बंदी घालण्यात आली होती, चंद्रपूर शहर महानगरपालिकेने व्यापक जनजागृती केली त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळुन एकही पीओपी मूर्तीची विक्री झाली नाही. शहरातील घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांनी मनपाच्या कृत्रिम कुंडाचा लाभ घेत ८०६४ गणेश मूर्तींचे विसर्जन पर्यावरणपूरकरीत्या केले व १०० टक्के पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्यास हातभार लावला होता.

यावर्षीही पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने मनपा प्रयत्नशील असणार आहे. चंद्रपूर शहरामध्ये पीओपी मुर्तींची निर्मिती, आयात, साठा व विक्री होऊ नये, यासाठी चंद्रपूर महानगरपालिका कार्यरत असणार आहे. याकरीता प्रोत्साहन म्हणुन देखावे स्पर्धा घेण्यात येणार आहे. रेन वॉटर हार्वेस्टींगचे देखावे तयार करणाऱ्या गणेश मंडळांना आकर्षक बक्षिसे सुद्धा देण्यात येणार आहेत.

यंदा निर्बंध नसले तरी नागरिकांनी घरगुती श्रीगणेशाच्या मूर्ती ह्या २ फुटापेक्षा जास्त उंचीच्या नसाव्यात याची काळजी घ्यावी, असे आवाहन मनपा आयुक्त राजेश मोहीते यांनी केले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाद्वारे मोठ्या उंचीच्या मूर्तींची स्थापना केली जाते. मात्र त्यांनीही पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या दृष्टीने कमी उंचीच्याच गणेशमूर्तींची स्थापना करण्यासाठी पुढाकार घ्यावा व मूर्ती मनपाद्वारे व्यवस्था करण्यात आलेल्या विसर्जनस्थळीच विसर्जीत कराव्यात.

गणेशोत्सवादरम्यान प्रदूषणास हानी होईल, अशा मूर्तीची निर्मिती करू नये, मातीच्या मूर्तींना अपायकारक रंगाचा वापर न करता नैर्सगिक रंगाचा वापर करावा, घरगुती बाप्पांचे विसर्जन शक्यतो घरीच करावे अथवा फिरते विसर्जन कुंड व कृत्रीम तलावात करावे, निर्माल्य कुंडाचा वापर करावा, थर्माकोल आणि सिंगल युज प्लास्टिकचा वापर न करण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.