शबरी महामंडळाकडून रोजगार व स्वयंरोजगार करण्यासाठी आदिवासी तरुणांना मिळणार कर्ज

शबरी महामंडळाकडून रोजगार  स्वयंरोजगार करण्यासाठी आदिवासी तरुणांना मिळणार कर्ज

चंद्रपूर, दि. 11 : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या 18 ते 45 वयोगटातील स्त्री-पुरुष तसेच बचत गटासाठी रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करण्याच्या उद्देशाने अल्प व्याजदरावर दीर्घ मुदतीच्या विविध कर्ज योजना राबविण्यात येतात.  अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगार करण्याच्या मुळ उद्देशाने सन 2023-24 या वर्षाकरीता राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळ, नवी दिल्ली यांच्याकडून शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित नाशिक, चंद्रपूर शाखा कार्यालयास विविध कर्ज योजनेचे लक्षांक (उद्दीष्ट) प्राप्त झाले आहे.

अनुसूचित जमाती प्रवर्गातील 18 ते 45 वर्ष वयोगटातील स्त्री-पुरुष व बचत गटांना अल्प व्याजदरावर दीर्घ मुदतीकरीता कर्ज घ्यावयाचे असल्यास शाखा कार्यालय, चंद्रपूर येथे कर्ज मागणी अर्ज रु. 10 शुल्कासह कार्यालयीन वेळेत सकाळी 9.45 ते 6.15 दरम्यान उपस्थित राहावे. प्रत्यक्ष लाभार्थी हजर असल्यावरच सदर कर्ज योजनेचे अर्ज देण्यात येईल. इतर कोणीही व्यक्ती लाभार्थ्याच्यावतीने आल्यास अर्ज देण्यात येणार नाही. अर्ज प्राप्त करुन घेतांना स्वतःचे आधारकार्ड किंवा जातीचा दाखला तसेच आवश्यक कागदपत्रे सोबत आणावे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करूनच कर्ज योजनेचा लाभ घ्यावा.

योजनेत स्वयंसहायता बचत गटासाठी 5 लक्ष,  प्रवासी वाहन व्यवसायासाठी 10 लक्ष, मालवाहू वाहन व्यवसायासाठी 10 लक्ष, ऑटो रिक्षा व्यवसायासाठी 2.40 लक्ष रुपये कर्ज महामंडळातर्फे देण्यात येत आहे. याकरीता संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याकरीता एकुण 8 लक्षांक प्राप्त झाले आहे. योजनेच्या अधिक माहितीकरीता, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित नाशिक, शाखा चंद्रपूर, मुल रोड, मधुबन प्लाझा 3 रा माळा, माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कुलच्या बाजुला, शिवाजी नगर, चंद्रपूर या कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाचे शाखा व्यवस्थापक आर. एस. भदाणे यांनी केले आहे.