नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने नेत्रदानासाठी पुढे यावे –  डॉ. निवृत्ती राठोड Ø जिल्हा सामान्य रुग्णालयात 36 व्या नेत्रदान पंधरवड्याचा शुभारंभ

नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने नेत्रदानासाठी पुढे यावे –  डॉ. निवृत्ती राठोड

Ø जिल्हा सामान्य रुग्णालयात 36 व्या नेत्रदान पंधरवड्याचा शुभारंभ

चंद्रपूर दि. 26 ऑगस्ट : कोविडच्या प्रादुर्भावामुळे नेत्रदान करणाऱ्यांचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. त्यामुळे अफवेला बळी न पडता स्वयंस्फूर्तीने नेत्रदानासाठी पुढे यावे व अंध व्यक्तीच्या जीवनात प्रकाश निर्माण करावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी  केले. 36  व्या नेत्रदान पंधरवाड्याच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी रक्त संक्रमण अधिकारी डॉ.अंनत हजारे, नेत्र शल्य चिकित्सक डॉ. सरोदे, डॉ. पटेल, डॉ. वाघमारे, मानसिक आरोग्य कार्यक्रमाचे कर्मचारी  तसेच नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनी व रुग्ण उपस्थित होते.

नेत्रदान पंधरवाड्याचा उद्देश सांगताना डॉ. दूधे म्हणाले की, बुब्बुळाच्या आजाराने अंध असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावर एकच उपाय म्हणजे मृत व्यक्तीचा निरोगी बुब्बुळ प्रत्यारोपण करणे हा होय. दरवर्षी या रुग्णांमध्ये वाढ होत असते. याकरिता जास्तीत जास्त मरणोत्तर नेत्रदान करून बुब्बुळाची मागणी व पुरवठा यामधील तफावत दूर करणे आवश्यक आहे. तसेच व्यक्तींनी जिवंतपणी  रक्तदान तर मरणोत्तर नेत्रदान करणे आवश्यक असल्याचेही डॉ. दूधे म्हणाले.

            नेत्रदान कोणालाही करता येते, नेत्रदान मृत्यूनंतर सहा तासाच्या आत करता येऊ शकते. कुटुंबात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास आधी इच्छापत्र भरले नसेल तरीही नातेवाइकांच्या संमतीने नेत्रदान करता येते. याकरीता जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे संपर्क साधावा. तसेच डॉक्टरांची टीम येईपर्यंत रुग्णांच्या पापण्या झाकून ठेवाव्यात व डोळ्यावर थंड पाण्याचा कपडा ठेवावा, असे नेत्र शल्य चिकित्सक डॉ. सरोदे यांनी सांगितले.