मत्स्यव्यवसायाशी संबंधित असणाऱ्या कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी 

मत्स्यव्यवसायाशी संबंधित असणाऱ्या कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी 

भंडारा, दि. 29 : देशातील असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा फायदे देण्याच्या अनुषंगाने सुरू करण्यात आलेल्या ई-श्रम पोर्टलवर मासेमारी करणारे, मत्स्य विक्रेते व मत्स्यव्यवसाय अनुषंगिक कामांशी प्रत्यक्ष संबंधित असलेल्या कामगारांनी नोंदणी करावी, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाचे प्र. सहाय्यक आयुक्त कै. तु. मारबते यांनी केले आहे.

मत्स्यव्यवसाय क्षेत्राशी निगडित कामगारांना ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे. या पोर्टल मध्ये नोंदणी झाल्यास मत्स्यव्यवसाशी संबंधित व्यक्तींना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू नंतर 2 लाख व कायमस्वरूपी दिव्यांगत्व असल्यास 1 लाख रुपये मदत शासनामार्फत देणे शक्य होईल.

जिल्ह्यातील मत्स्यकास्तकार स्वतः या पोर्टलवर नोंदणी करू शकतात अथवा जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र येथे नोंदणी करू शकतात. ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी कामगार कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे सभासद नसावा तसेच सदर व्यक्ती कोणत्याही शासकीय व निमशासकीय सेवेत नसावा व यासाठी वयोमर्यादा १६ ते ५९ वर्षे आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, भंडारा कार्यालयाशी संपर्क साधावा.