ग्राहकांना अखंड वीज पुरवठा देणे हेच महावितरणचे ध्येय – मुख्य अभियंता देशपांडे

ग्राहकांना अखंड वीज पुरवठा देणे हेच महावितरणचे ध्येय – मुख्य अभियंता देशपांडे

Ø चिमूर येथे उज्वल भारत, उज्वल भविष्य, ऊर्जा महोत्सवाचे आयोजन

चंद्रपूर, दि. 27 जुलै : अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणेच वीज ही मनुष्याची प्राथमिक गरज आहे. त्यामुळेच ग्राहकांना अखंड वीज पुरवठा देणे, हे महावितरण कंपनीचे मुख्य ध्येय आहे, असे प्रतिपादन महावितरणचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी केले. चिमूर येथे ऊर्जा विभागाच्या वतीने आयोजित उज्वल भारत, उज्वल भविष्य या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

यावेळी मंचावर भद्रावती पॉवर ग्रीडचे मुख्य महाप्रबंधक अरिंदम सेन शर्मा, चंद्रपूर मंडळाच्या अधिक्षक अभियंता संध्या चिवंडे, महापारेषणचे अधीक्षक अभियंता प्रफुल अवघड, चिमूरचे उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ उपस्थित होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ऊर्जा विभागाच्यावतीने 25 ते 30 जुलै या कालावधीत संपूर्ण देशात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे, असे सांगून मुख्य अभियंता श्री. देशपांडे म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरला शहीद क्रांतीचा मोठा वारसा लाभल्यामुळे या ऊर्जा महोत्सवासाठी चिमूरची निवड करण्यात आली आहे. आजच्या काळात वीज ही नागरिकांची प्राथमिक गरज आहे. महावितरण ही ऊर्जा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. ग्राहकांना अखंड वीज पुरवठा देणे, हे कंपनीचे मुख्य ध्येय आहे. गत आठवड्यात चिमूरमध्ये आलेल्या पूर परिस्थितीत महावितरणच्या सर्व अधिकारी – कर्माचाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी अखंड सेवा दिली. हे नक्कीच कौतुकास्पद आहे, असे ते म्हणाले.

यावेळी प्रफुल अवघड म्हणाले, विभागाचे चांगले काम लोकांपर्यंत गेले पाहिजे, ग्राहकांना चांगली सेवा देणे, हे आपले प्राथमिक कर्तव्य आहे. त्यामुळे कंपनीची प्रतिमा आणखी चांगली होईल.

अरिन्दमसेन शर्मा म्हणाले, ऊर्जाक्षेत्रात केंद्र सरकारने मोठी मजल मारली आहे. आज भारत, शेजारी देशातसुद्धा विजेची निर्यात करतो. 2030 पर्यंत अक्षय ऊर्जेचे गाठावयाचे लक्ष भारताने 2021 मध्येच पूर्ण केले आहे, असे त्यांनी सांगितले. तर उपविभागीय अधिकारी श्री. संकपाळ म्हणाले, चंद्रपूर हा ऊर्जा निर्माण करणारा जिल्हा आहे. येथे विद्युत विभागाचे काम चांगले असल्यामुळे नागरिकांच्या तक्रारी कमी आहेत. ही बाब अभिनंदनीय असून ग्राहकांना आणखी चांगली सेवा देण्यासाठी विभागाने प्रयत्नशील राहावे. तसेच नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविकातून अधिक्षक अभियंता श्रीमती चिवंडे म्हणाल्या, उज्वल भारत, उज्वल भविष्य ऊर्जा महोत्सव अंतर्गत जिल्ह्यात चिमूर आणि मूल (30 जुलै) या दोन ठिकाणी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पारंपरिक आणि अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील 2047 पर्यंत ध्येय निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी संगितले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्युत विभागाच्या योजनांचा लाभ घेतलेल्या नागरिकांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. यात जितेंद्र गोनेवार, विठोबा झिंगरे, किसन मांडवकर, लिलाधर जांभूळे, अजहर शेख आदींचा समावेश होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि शहीद बालाजी रायपुरकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. यावेळी मागासवर्गीय मुलींचे शासकीय वस्तीगृह येथील मूलींनी स्वागतनृत्य सादर केले.

कार्यक्रमाचे संचालन सुशील सहारे यांनी केले. यावेळी विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन घडोले (वरोरा), सुहास पडोळे (चंद्रपूर), विजय राठोड, उपकार्यकारी अभियंता संजय जळगावकर यांच्यासह सर्व अभियंते, शाखा अभियंते, उपअभियंते, इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता आदिवासी नृत्याने झाली.