विशेष लेख – आला पावसाळा, आरोग्य सांभाळा

विशेष लेख – आला पावसाळा, आरोग्य सांभाळा

पावसाळ्यात पाणी उकळून प्या, आजाराला दूर ठेवा

Ø जलजन्य आजाराचा धोका अधिक Ø आरोग्य विभाग सज्ज Ø काळजी घ्या, निरोगी रहा   

नेमेची येतो पावसाळा ….या काव्यपंक्ती आपण वाचलेल्या आहेत. पावसाळा म्हणजे गरम चहा व भजी हेच समीकरण आठवतं. मात्र नेहमीच येणारा पावसाळा हा सोबत अनेक आजार घेवून येतो. त्याला प्रतिबंध करण्यासाठी पावसाळ्यात विशेष काळजी घेतली पाहिजे.

पावसाळ्यात पावसाच्या साचलेल्या दूषित पाण्यामुळे अनेक साथीचे रोग पसरतात. नकळत दूषित पाणी प्यायलं जातं. त्यामुळे आजारांना सामोरं जावं लागतं. पण दूषित पाणी पिल्यामुळे जुलाब, उलटी, टायफॉइड, गॅस्ट्रो, विषाणू, जीवाणूंचे आजार, जंतूची वाढ यांसारखे आजार होतात. या पासूनच स्वतःचा बचाव करण्यासाठी पावसाळ्यात पाणी उकळून प्या व जलजन्य आजाराला दूर ठेवा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

दूषित पाणी प्यायल्यानंतर सात ते आठ दिवसात उलट्या, ताप, लघवी पिवळी होणं किंवा भूक मंदावणं ही लक्षणं दिसतात. त्याशिवाय चार ते पाच दिवसांनी डोळे पिवळे दिसायला लागतात. महिना ते दीड महिन्यात हा आजाराची लक्षणं कायम राहतात. 90 ते 95 टक्के नागरिकांमध्ये हा आजार दिसून येतो. टायफॉईड हा आणखी एक आजार दूषित पाण्यामुळे होतो. चार ते पाच दिवसात मोठ्या प्रमाणात ताप येतो. पोटात खूप दुखतं. उपचार न घेतल्यास टायफॉइडचे जंतू रक्तात मिसळतात. यामध्ये काही रुग्ण दगावण्याची भीती असते.

उपचार काय कराल ?

        पावसाळ्यात पाणी पिताना शुद्ध करून पिणं हा सर्वोत्तम उपाय. त्याकरता विविध माध्यमांचा वापर करता येऊ शकतो. पाणी उकळून प्यावं. मेडिक्लोर ड्रॉप्स पाण्यात टाकल्यानंतर ते प्यावं. त्यामुळे पाण्यात साचलेली माती अथवा गाळ हा तळाशी जाऊन आपल्याला स्वच्छ पाणी मिळतं. पावसाळ्याच्या दिवसात बाहेरचं खाणं टाळावं. पाणीपुरी, भेळ अथवा इतर पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. उलट्या, जुलाबांमुळे शरीरातील पाणी कमी होतं. त्यावेळी मीठ- साखर पाणी सतत पित राहावं. त्यामुळे शरीराला आराम मिळू शकतो. ओआरएस पावडर मिळते. ती एक लीटर पाण्यात टाकून प्यावी. नारळाचं पाणी घ्यावं. मात्र ग्लुकॉन डी अथवा कोल्ड ड्रींक्स घेणं या दिवसात टाळावं.

उघड्यावरील खाणं टाळा

       आपल्या देशात बऱ्याच आगळ्यावेगळ्या गोष्टी प्रसिद्ध आहेत. त्यातली एक गोष्ट आहे, रस्त्यावर विकले जाणारे उघडे खाद्य पदार्थ आणि ते आवडीनं खाणारे लोक. कापलेली फळं, पाणीपुरी, इडली, डोसा, वडापाव, पोहे असे पदार्थ विकणारे बरेच ठेले, हातगाड्या प्रत्येक गल्ली आणि चौकात दिसतात. या ठिकाणी उत्तर भारतापासून दक्षिण भारतीय पदार्थांपर्यंत आणि चायनीज पदार्थही मिळतात. असे खाद्य पदार्थ विकणारे माशा, कीटक, धूळ यांची भीडभाड न ठेवता, हे पदार्थ झाकण्याची तसदी न घेता दिवसाकाठी छान पैसे कमावतात. मुख्यतः हे पदार्थ चवदार, गरमागरम आणि स्वस्त असल्यामुळे त्यांचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो, याचा विचार न करता आपण आनंदानं खातो. हे पदार्थ उघडे आणि अस्वच्छ असल्यामुळे शरीरासाठी अतिशय हानिकारक असू शकतात. त्यामुळे टायफॉइड, गॅस्ट्रो, पोटदुखी, वारंवार पोट बिघडणं, अन्नातून विषबाधा असे विविध आजार होऊ शकतात. त्यातच गाड्यांमधून बाहेर पडणाऱ्या कार्बनयुक्त धुराचे कण या अन्नावर बसून आपल्या पोटात जातात.

आजारांपासून कसे वाचाल ?

   सर्वांत महत्त्वाचं म्हणजे अशा ठिकाणी खाऊ नका. खाणं अगदीच टाळू शकत नसाल, तर निदान पुढील गोष्टींवर जाणीवपूर्वक लक्ष असू द्या-

Ø  पदार्थ करणारी व्यक्ती

अ. निरोगी आहे. (कपडे स्वच्छ आहेत, नखं कापलेली आहेत, अंगावर जखमा नाहीत)

ब. पदार्थ तयार करताना, देताना तंबाखू खात नाही किंवा सिगारेट ओढत नाही.

Ø  वापरलेलं पाणी

अ. पिण्याचं पाणी आहे.

ब. पाणी झाकलेल्या भांड्यात साठवलेलं आहे आणि ते घेण्यासाठी भांड्याला नळ आहे.

क. बर्फ स्वच्छ आणि बंद पेटीत साठवला जातो.

Ø  वापरण्यासाठी आणि साठवण्यासाठीची भांडी

अ.भांडी स्वच्छ आहेत.

ब. वाढण्याचं काऊंटर आणि टेबल स्वच्छ आहे.

क.नष्ट करण्याजोगी भांडी वापरा.

सर्वांत महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी उघडं गटार, कचरापेटी किंवा स्वच्छतागृह नसावं. उघड्यावरचं खाणं आरोग्यासाठी वाईट आहे, हे लक्षात घेऊन आपल्या मुलांना त्याची माहिती द्या. यानंतरही जलजन्य आजार झाल्यास घाबरू नका जवळच्या सरकारी रुग्णालयात जाऊन उपचार घ्या. पावसाळ्यात होणाऱ्या आजाराबाबत सर्व प्रकारची औषधे आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिली आहेत. निरोगी रहा, काळजी घ्या, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद सोमकुंवर यांनी केले आहे.