प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून मिळणार अर्थसहाय्य

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून मिळणार अर्थसहाय्य

  • अर्ज करण्यासाठी 15 जूनपर्यंत मुदत

भंडारा, दि. 3 : प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून अर्थसहाय्य मिळण्यासाठी अर्ज करण्यास 15 जूनपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. नवीन व कार्यरत सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांच्या विस्तारीकरण व अद्ययावतीकरणासाठी अर्थसहाय्य केले जाणार आहे. या योजनेकरीता इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी 15 जूनपर्यंत अर्ज सादर करावे, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अरुण बलसाने यांनी केले आहे.

जिल्ह्यात एक जिल्हा एक उत्पादन या घटकामध्ये भात पिकाची निवड केलेली आहे. परंतु, भाता व्यतिरिक्त इतर नॉन ओडीओपी करीता नवीन प्रकल्पासाठी देखील अर्ज करता येईल.

 काय आहे योजनेचे स्वरूप : या योजनेत सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना बॅक कर्जाशी निगडीत पात्र किमतीच्या 35 टक्क्यांपर्यंत व जास्तीत जास्त 10 लाख रूपये मर्यादेत प्रती प्रकल्पासाठी अनुदान देण्यात येईल. यामध्ये लाभार्थी हिस्सा 10 टक्के असेल. यासाठी पात्र उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे पुर्ण असावे. शिक्षणाची अट नाही. सामाईक पायाभुत सुविधांसाठी यापूर्वी निर्धारित केलेली आर्थिक व्यवहाराची अट व अनुभव शिथिल करण्यात आले आहे. वैयक्तिक सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, इनक्युबेशन सेंटर, पायाभुत सुविधा, ब्रॅडीग व विपणन, क्षमता बांधणी व संशोधन प्रशिक्षण संस्थेबाबत प्रशिक्षण या बाबतच्या अटी व शर्तीची माहिती www.krushi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

या योजनेमध्ये 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षाच्या कालावधीसाठी असंघटीत क्षेत्रातील अन्न- प्रक्रिया उद्योगांच्या स्पर्धेत वाढ करणे, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहायता गट व उत्पादक सहकारी संस्थांच्या उत्पादनासाठी सर्वंकष मुल्यसाखळी विकसित करण्यावर भर देण्यात येईल. अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांसाठी योजनेचा अर्ज कृषी विभागाच्या  http://pmfme.mofpi.gov.in  या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय, बॅंक ऑफ बडोदाचे वर, जेल रोड, राजीव गांधी चौक, भंडारा येथे 07184-252393 या क्रमांकावर संपर्क करावा.