चंद्रपूर जिल्‍हयातील वनविभागाचे महत्‍वपूर्ण प्रकल्‍प जलदगतीने पूर्ण करा – आ. सुधीर मुनगंटीवार यांचे वनविभागातील अधिका-यांना झूम बैठकीत निर्देश.

चंद्रपूर जिल्‍हयातील वनविभागाचे महत्‍वपूर्ण प्रकल्‍प जलदगतीने पूर्ण करा – आ. सुधीर मुनगंटीवार यांचे वनविभागातील अधिका-यांना झूम बैठकीत निर्देश.

मी वनमंत्री असताना चंद्रपूर जिल्‍हयात अनेक महत्‍वाकांक्षी प्रकल्‍प वनविभागातर्फे आणण्‍याचे काम त्‍यांनी केले. ज्‍यामध्‍ये प्रामुख्‍याने वनअकादमी, बॉटनिकल गार्डन, बांबु प्रशिक्षण व संशोधन केंद्र, बांबु उद्योग केंद्र यांचा प्रामुख्‍याने समावेश आहे. या सर्व प्रकल्‍पांचे कामकाज मागील काही काळापासून निधीअभावी व तांत्रीक मान्‍यतेअभावी रखडलेले आहे.

आज या सर्व प्रकल्‍पांचा आढावा घेण्‍यासाठी एका झूम मिटींगचे आयोजन करण्‍यात आले होते. या मिटींगला वनविभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्‍य वनसंरक्षक, मुख्‍य वनसंरक्षक व संबंधित सर्व वनाधिकारी उपस्थित होते. या सर्व प्रकल्‍पांचा विस्‍तृत आढावा यावेळी आ. मुनगंटीवार यांनी घेतला व हे सर्व प्रकल्‍प लवकरात लवकर पूर्ण करण्‍याचे निर्देश त्‍यांनी अधिका-यांना दिले.

वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात मृत किंवा जखमी मानव, पाळीव प्राणी तसेच शेतपिकांचे नुकसान होते. यावरच्‍या नुकसान भरपाईची रक्‍कम ताबडतोब मिळावयास हवी, परंतु सरकार यासाठी सुध्‍दा निधीची तरतूद करत नाही असे लक्षात आले. अशी नुकसान भरपाई पिडीतांना ताबडतोब मिळायला हवी, असे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी बैठकीत दिले.

बॉटनिकल गार्डन करता एक समयबध्‍द कार्यक्रम आखावा, प्‍लॅनेटोरियम चे पैसे सरकारने त्‍वरीत द्यावे, फायर फायटींगशी संबंधित व्‍यवस्‍था ताबडतोब करावी, विद्युत विभागाचे बिल शुन्‍य करण्‍यासाठी सोलार सिस्‍टीम बसवावी, देखभालीसंदर्भात अंदाजपत्रक तयार करून सामाजिक न्‍याय विभागातुन किंवा वनविभागातुन निविदा काढून ताबडतोब काम सुरू करावे.

वनअकादमीचे ही बरेच काम पूर्ण झाले असून उर्वरित कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने १९ कोटी रूपयांची मागणी शासनाकडे केली आहे. हा निधी आल्‍यास उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण होईल असे अधिका-यांनी सांगीतले. फायर ऑडीटचे फायनल सर्टिफिकेट येणे बाकी असल्‍याचे सांगीतले. आ. मुनगंटीवार यांनी ही इमारत उत्‍तम तयार झाली असून वन से धन तक या धर्तीवर एक उत्‍तम स्‍कील डेव्‍हलपमेंट सेंटर व्‍हावे अशी ईच्‍छा व्‍यक्‍त केली. केंद्र शासनाशी करार करून वनअकादमी चालविण्‍यासंदर्भात एक प्रस्‍ताव तयार करावा, असेही ते म्‍हणाले.

बॉटनिकल गार्डन, वनअकादमी व बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्र या तिनही संस्‍थांसाठी एक अधिकारी नेमावा, जेणेकरून या प्रकल्‍पांमधुन व्‍यावसायिक दृष्‍टीकोन ठेवून वनविभागाला फायदा मिळेल. चंद्रपूर जिल्‍हयात खुप मोठा भाग वनांचा असल्‍यामुळे व वेगवेगळया कारणांमुळे इथे आगी लागत असल्‍यामुळे वनविभागाने स्‍वतःची एक फायर फायटींग सिस्‍टीम विकसित करावी जी संपूर्ण जिल्‍हयासाठी उपयोगी ठरेल व महाराष्‍ट्रातील असे करणारा चंद्रपूर हा पहिला जिल्‍हा होईल. यासंदर्भातला प्रस्‍ताव अंदाजे २५ कोटी रूपयांपर्यंत तयार करून केंद्र शासनाला पाठवावा.

ताडोबा व्‍याघ्र प्रकल्‍पाचे एकूण क्षेत्रफळ १७०० चौरस किलोमीटर आहे. यापैकी ११०० चौरस किलो‍मीटर परिसरात बांबुला फुलोरा येईल. या काळात बफर ऐरिया बांबु कापण्‍याचा रोजगार त्‍या गावातील लोकांना मिळू शकेल. फायर लाईन मोठया करण्‍यासाठी तेथे मजूर लावावे लागतील. बिनतारी संदेशांचे बळकटीकरण करणे, जुन्‍या रस्‍त्‍यांची दुरूस्‍ती करणे या व अनेक योजना राबविणे आवश्‍यक असल्‍याचे अधिका-यांनी सांगीतले. या सर्व बाबींसाठी २२ कोटी रूपयाचे प्रस्‍ताव एनटीसीए ला पाठविले आहेत. हा प्रकल्‍प ताडोबा बरोबरच सर्व जिल्‍हयात राबवावा असेही अधिका-यांनी सुचविले.

बांबु प्रशिक्षण व संशोधन केंद्रासंदर्भातली माहिती संबंधित वनअधिका-यांनी दिली. अजूनही शासनाकडून अंदाजे १२ कोटी रूपये येणे असल्‍याचे अधिका-यांनी सांगीतले. २१.६.२०२१ ला फायर ऑडीट प्राप्‍त झाले असल्‍याचेही त्‍यांनी सांगीतले. यासंदर्भातील विस्‍तृत सादरीकरण अधिका-यांनी केले. या प्रकल्‍पाशी संबंधित वेगवेगळया इमारतींचे क्‍यु. आर. कोड तयार करून त्‍याचे सुंदर सादरीकरण अंबानी फाऊंडेशन, टाटा ट्रस्‍ट व इन्‍फोसीस सारख्‍या कंपन्‍यांना पाठवावे व त्‍यांच्‍या सीएसआर निधी मधून आपल्‍या प्रकल्‍पाला काही निधी मिळेल असे प्रयत्‍न करावे. आयटीसी कंपनीशी काही करार करता येईल का याचा अभ्‍यास करावा असे आ. मुनगंटीवार यांनी सांगीतले.

प्रधान मुख्‍य सचिव यांनी पुढील १५ दिवसात चंद्रपूर शहराला प्रत्‍यक्ष भेट द्यावी, जेणेकरून सर्व प्रकल्‍पांची माहिती त्‍यांना होईल, असेही आ. मुनगंटीवार म्‍हणाले. चंद्रपूर जिल्‍हयाशी संबंधित सर्व महत्‍वांच्‍या प्रकल्‍पांची बैठक केंद्र सरकार बरोबर लवकरात लवकर लावावी असेही निर्देश याप्रसंगी आ. मुनगंटीवार यांनी दिले.

निसर्ग पर्यटन क्षेत्रासाठी १.६३ कोटी रूपयांचा प्रस्‍ताव राज्‍य शासनाकडे प्रशासकीय मान्‍यतेसाठी प्रलंबित असल्‍याचे अधिका-यांनी सांगीतले. त्‍याचबरोबर मोहर्ली व कोलारा गेटवर एंट्रन्‍स प्‍लाझा करण्‍यासाठी ७ कोटी रूपयांचा प्रस्‍ताव तयार आहे. चंद्रपूरला वनअकादमीजवळ २०० हेक्‍टर जागेवर व्‍याघ्र सफारी व प्राण्‍यांवरील उपचार केंद्र करण्‍याचा प्रस्‍ताव नियोजित आहे. यासाठी कॅम्‍पामधून ५० कोटी रूपयांची तरतूद होवू शकते. यावर आ. मुनगंटीवार यांनी सांगीतले की निसर्ग पर्यटन क्षेत्रासाठी आगा खान ट्रस्‍ट ५० लाख रूपये देण्‍यासाठी तयार आहे. उर्वरित रक्‍कम डीपीडीसी मधून घ्‍यावी. प्राण्‍यांवरील उपचार केंद्र ताबडतोब सुरू करण्‍याचे निर्देश याप्रसंगी आ. मुनगंटीवार यांनी दिले.

अशा अनेक मुद्दयांवर चांगली चर्चा होवून सकारात्‍मक दिशेने अधिका-यांनी पुढे जावे, मी त्‍यांच्‍या पाठीशी ठामपणे उभा आहे असा विश्‍वासही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शेवटी दिला. सर्वांचे आभार मानून बैठक समाप्‍त करण्‍यात आली.