कोरोनामुक्त गाव करण्यासाठी ‘मिशन मोडवर’ नियोजन करा – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

कोरोनामुक्त गाव करण्यासाठी ‘मिशन मोडवर’ नियोजन करा – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

Ø लसीकरणासाठी प्रत्येक गावापर्यंत पोहचण्याचे निर्देश

चंद्रपूर,दि. 25 जून : ‘कोरोनामुक्त गाव’ ही संकल्पना राज्य शासनाने सुरु केली आहे. याची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने वरिष्ठ स्तरावरून नियमित आढावा घेण्यात येतो. कोरोनाविरुध्दच्या लढाईत जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे गावापर्यंत पोहचून कोरोनमुक्त गाव करण्यासाठी ‘मिशन मोडवर’ नियोजन करा, अशा सुचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोव्हीड-19 बाबत आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, पोलिस उपअधिक्षक शेखर देशमुख, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम आदी उपस्थित होते.

तिस-या लाटेचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर गावांचे 100 टक्के लसीकरण होणे गरजेचे आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र असे असले तरी गाफील राहून चालणार नाही. कोरोनाविरुध्दच्या लढाईत लसीकरण हा महत्वाचा टप्पा आहे. त्यामुळे गावापर्यंत पोहचा. गावनिहाय लसीकरणासाठी पात्र लोकसंख्या किती, लसींचे किती डोज आवश्यक आहे, उपलब्ध साठ्याचे वितरण आदी बाबींचे नियोजन करा. जेथे लसीकरणासाठी कमी प्रतिसाद आहे, तेथे जास्त लक्ष केंद्रीत करून स्थानिक लोकप्रतिनिधी आणि गावस्तरावरील कर्मचा-यांच्या माध्यमातून जनजागृती करा. लसीकरणासाठी वेगवेगळ्या गटांची (व्यापारी, उद्योजक, मजूरवर्ग, विद्यार्थी, सुपर स्प्रेडर आदी) निर्मिती केली तर ते जास्त सोयीचे होते, असे त्यांनी सांगितले.

लसीच्या उपलब्धतेबाबत नागरिकांना माहिती द्या. लसीकरण सत्र सुरू आहे किंवा आज लसीकरण होणार नाही, याची पूर्वकल्पना नागरिकांना अवश्य द्या. नगर परिषद क्षेत्रातसुध्दा मुख्याधिकारी आणि त्यांच्या अधिनस्त कर्मचा-यांनी तहसीलदारांच्या समन्वयातून टीमचे गठन करावे. तसेच वॉर्डावॉर्डात जावून लसीकरण आणि म्युकरमायकोसीसबाबत जनजागृती करावी. कोविडमुळे पालक गमाविलेल्या बालकांना शासनाकडून मदत देण्यात येणार आहे. अशा बालकांचे संरक्षण करणे आणि त्यांचे हक्क मिळवून देणे, यासाठी गांभिर्याने प्रयत्न करा. लसीकरणासंदर्भात सर्व उपविभागीय अधिका-यांनी तालुकास्तरावर आठवड्यातून किमान दोन वेळा कृती दलाची बैठक आयोजित करावी. यापुढे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला तर त्यांना केवळ कोविड केअर सेंटर किंवा शासकीय विलगीकरण केंद्रातच ठेवण्याच्या शासनाच्या सुचना आहेत. तसेच कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रॅकिंगची व्यवस्था आणखी मजबूत करा, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड यांनी डेल्टा प्लस विषाणूबाबत माहिती दिली. तसेच याबाबत जागरूक राहून प्रतिबंधात्मक उपाययोजना गांभिर्याने करण्याबाबत अवगत केले.

बैठकीला मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. नयना उत्तरवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुवर यांच्यासह दूरदृश्य प्रणालीद्वारे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, न.प.मुख्याधिकारी, वैद्यकीय अधिक्षक आदी उपस्थित होते.