समाजकल्याण कार्यालयात सामाजिक न्याय पर्व कार्यक्रमांतर्गत महात्मा फुले यांची जयंती कार्यक्रम

समाजकल्याण कार्यालयात सामाजिक न्याय पर्व कार्यक्रमांतर्गत महात्मा फुले यांची जयंती कार्यक्रम

 

चंद्रपूर, दि.12 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने राज्यभर संपन्न होत असलेल्या सामाजिक न्याय पर्व कार्यक्रमांतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर व महाज्योती यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिबा फुले जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 

याप्रसंगी हिराचंद बोरकुटे, ऊर्जा विभागाचे सेवानिवृत्त लेखाधिकारी सुधाकर रामटेके, समाजकार्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. टिकले, प्राध्यापक बोरकर, प्राध्यापक ठाकूरवार, श्री. माकोडे, श्रीमती तन्नीरवार, श्रीमती आसेगांवकर आदींची उपस्थिती होती.

 

सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार समाजकार्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. टिकले यांनी महात्मा फुले यांच्या सत्यशोधनाचे कार्य अपूर्ण असून आज ते पूर्ण करण्याची जबाबदारी युवावर्गावर आली आहे. तसेच फुले, शाहू व आंबेडकरांच्या स्वप्नातील नवा समाज निर्माण करावा असेही ते म्हणाले. हिराचंद बोरकुटे यांनी महात्मा फुलेंनी लिहिलेल्या “शेतकऱ्यांचा आसूड” व “गुलामगिरी” हे ग्रंथ व त्यातील विचार समजून घेण्याची आवश्यकता आहे, असे सांगितले. तर सुधाकर रामटेके यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे कार्य हे खऱ्या अर्थाने सुधारणावादी असून नवनिर्मिती करण्यासाठी त्या कार्याचे अनुकरण करणे काळाची गरज असल्याचे म्हणाले.

 

कार्यक्रमाला समाजकल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक तसेच शासकीय वसतिगृहाचे गृहपाल व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार बार्टी, पुणेचे प्रकल्प अधिकारी सचिन फुलझेले यांनी केले.

 

महात्मा फुले जयंतीनिमित्त योजनांची जनजागृती : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे राबविण्यात येत असलेल्या योजनांची पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली. तसेच या योजना जनसामान्यापर्यंत पोहचविण्याकरीता मार्गदर्शन करण्यात आले.