जिल्ह्याच्या सर्वागिण विकासासाठी शासन कटीबध्द पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावीत

जिल्ह्याच्या सर्वागिण विकासासाठी शासन कटीबध्द

पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावीत

जिल्हयात 47 टक्के नागरिकांनी आयुष्यमान कार्डधारक

 उदयोग वाढीसाठी विशेष प्रयत्न 

          भंडारा दि. 26 आयुष्यमान कार्ड काढण्यात राज्यात जिल्हा 4 थ्या क्रमांकावर असून   जिल्हयात 4 लाख 79 हजार 308 म्हणजे 47 टक्के नागरिकांनी हे कार्ड काढले आहे.जिल्हयात उदयोग वाढीसाठी विशेष प्रयत्न सुरू असुन  जिल्हयाच्या सर्वागिण विकासासाठी कटीबध्द असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांनी आज केले.

         पोलीस मैदानात आयोजित मुख्य प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला ध्वजारोहण केल्यानंतर राष्ट्रगीत  व राज्यगीत झाले. त्यांनतर पोलीस, गृहरक्षक दल, शालेय विदयार्थी यांच्यासह विविध पथकांनी मानवंदना दिली. यावेळी व्यासपीठावर  जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे,खासदार सुनिल मेंढे यांच्यासह जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर,मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, पोलीस अधिक्षक लोहीत मतानी, उपवनसंरक्षक राहुल गवई, निवासी उपजिल्हाधिकारी लीना फलके उपस्थित होत्या.

         प्रगतीच्या नव्या पाऊलवाटावरून चालत राहणे मानवाचा मूलभूत स्वभाव आहे. या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या जिल्ह्याच्या सर्वागिण विकासासाठी सर्व जिल्हावासी व शासन, प्रशासनासह एकत्रितरित्या प्रयत्न करूया अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. अनेक ज्ञात-अज्ञात हुतात्मांनी केलेल्या संघर्षामुळे स्वातंत्र्य मिळाले असून लोकांच्या सहभागानेच समृध्द लोकशाहीची परंपरा देशात कायम असल्याचे श्री .गावीत म्हणाले.पर्यटनातून रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी भंडारा जिल्ह्याला 100 कोटी  निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

             वनपर्यटनासोबतच जल पर्यटन क्षेत्राचा विकास तसेच पर्यटकांसाठी विविध सुविधा निर्माण करण्यात येत आहेत.उदयोग वाढीसाठी जिल्हयात मोठया प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र शासनाचे उद्योग संचालनालय सूक्ष्म आणि लघु उद्योगांच्या विकासासाठी ‘औद्योगिक क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम,राबवत आहे. या प्रोग्राम अंतर्गत, केंद्र सरकारचा ‘मायक्रो, स्मॉल एंटरप्रायझेस क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम,आणि राज्य सरकारचा ‘महाराष्ट्र स्टेट इंडस्ट्रियल क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम’ या दोन योजनांचा समावेश आहे. क्लस्टर योजनेमुळे एमएसएमई क्षेत्राला चांगल्या प्रकारे प्रोत्साहन देणे शक्य होत असल्याने, भंडारा जिल्हा प्रशासन येथील 7 तालुक्यामध्ये किमान एक क्लस्टर तयार करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे श्री.गावीत यांनी सांगितले.

महीला सक्षमीकरणासाठी नुकतेच आयआयएम ,नागपूर या विख्यात संस्थेत  जिल्हयातील विविध बचत गटांच्या 75 महिलांना   आपॅकेजिंग, ब्रॅण्डिंग, ऑनलाइन मार्केटिंगचे एक दिवसीय  प्रशिक्षण  देण्यात आले. आरोग्य विभागामार्फत सिकलसेल नियंत्रण कार्यक्रमातर्गंत 51 हजारहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली असल्याचे पालकमंत्रयांनी सांगितले.

           याप्रसंगी उत्कृष्ट कार्य करणा-या अधिकारी –कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.पारितोषीक वितरणाचा कार्यक्रमही पार पडला. भंडारा पोलीस दलाकडून  अतिरेक्यांच्या तावडीतून सुटकेचा चित्त थरारक प्रात्याक्षिकाला उपस्थित नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पारितोषीक वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये सशस्त्र सेना ध्वजदिन निधी उत्कृष्ट संकलन 2022 करिता जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर व उपजिल्हाधिकारी आकाश अवतारे यांचा सन्मान करण्यात आला.

             यावेळी जिल्हयातील स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार करण्यात आला.त्यामध्ये रामा खंगार,नागो कनोजे,कांतीराव मिश्रा,काशीनाथ खरवडे,सखाराम दिपटे,शिवशंकर डेकाटे,रामपाल रहांगडाले,विश्वनाथ भाजीपाले, राजेश्वर रणदिवे,नक्कल वैदय,दशरथ गि-हेंपुजे,मनिराम नागोसे,मिताराम गभणे,सुधाकर हळवे,महादेव बावनकर,भैय्यालाल हाडगे,दादा चांदेवार,तुळशीराम मेश्राम,यांना सन्मानित करण्यात आले.

         यावेळी माजी सैनिक कल्याण पाल्य, आटयापाटया खेळामध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त वैष्णवी तुमसरे,राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक खुशाल डोंगरवार ,युवराज खोब्रागडे तसेच शासकीय आयटीआय मधील समशुददीन शेख,अजित रोटके,प्राज्वल रामटेके,कोमल शर्मा या स्टुंडंट इनोव्हेशन चॅलेज उपक्रमाच्या विजेत्यांना ही सन्मानित करण्यात आले.तर जिल्हा सामान्य रुग्णालय,व इंद्राक्षी आय केअर यांना जनारोग्य योजनेत कार्य करण्यासाठी गौरविण्यात आले.

         कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्मिता गालफाडे व मुकुंद ठवकर यांनी केले. कार्यक्रमाला सर्व वरिष्ठ अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर व विदयार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.