माविमच्या माध्यमातून तळागाळातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम – नरेश उगेमुगे

माविमच्या माध्यमातून तळागाळातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम – नरेश उगेमुगे

Ø जागतिक महिला दिन कार्यक्रम

 

चंद्रपूर, दि. 08 : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) हे तळागाळातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत काम करीत आहे. ज्यांना कोणताही आधार अशा महिलांसाठी माविम हे उत्कृष्ट व्यासपीठ असून अनेक रोजगाराभिमुख उपक्रमातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत, असे प्रतिपादन माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी नरेश उगेमुगे यांनी केले.

 

जागतिक महिला दिनानिमित्त संताजी सभागृह येथे आयोजित ‘घे भरारी’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर मानव विकास विभागाचे नियोजन अधिकारी सुनील धोंगडे, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, महिला व बालविकास संरक्षण अधिकारी श्यामराव मुदगीलवार उपस्थित होते.

 

ग्रामस्तरावर काम करणा-या माविमच्या सर्व महिलांनी एकत्रित येऊन आनंदोत्सव साजरा करावा, या उद्देशाने आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगून श्री. उगेमुगे म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक विभाग माविम सोबत जुळला आहे. स्त्री शक्ती म्हणून सर्व महिलांना समोर जायचे आहे. जिल्ह्यात 1994 पासून महिला बचत गटांची सुरवात झाली असून 11 लोकसंचालित साधन केंद्र स्वबळावर उभे आहेत. वर्षाकाठी 20 – 20 लाखांचा व्यवसाय त्या करीत असतात. एवढेच नाही तर वेगवेगळ्या बँकासोबत समन्वय साधून महिला बचत गटांना कर्ज मिळवून देण्याचे कामसुध्दा नियमितपणे सुरू आहे.

 

माविमसोबत जिल्ह्यातील जवळपास एक लाख महिला जुळल्या आहेत. माविमने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमसुध्दा सुरू केले आहेत. यात स्त्रियांना उत्कृष्ट सहकार्य करणा-या पुरुषांसाठी ‘शोध ज्योतिबांचा’ उपक्रम, घरावर पुरुष आणि महिला या दोघांच्याही नावाची पाटी असण्यासाठी ‘घर दोघांचे’ उपक्रम, सातबारा / आठ अ मध्ये घरच्या महिलेचे नाव चढविण्यासाठी ‘लक्ष्मीमुक्ती योजना’ आदी उपक्रमांचा समावेश आहे. तसेच महिलांची आर्थिक प्रगती होण्यासाठी ‘टूल बँकेच्या’ माध्यमातून कृषी अवजारे उपलब्ध करून देण्यात येत आहे, असे श्री. उगेमुगे यांनी सांगितले.

 

यावेळी मानव विकासचे श्री. धोंगडे म्हणाले, वेतननिश्चिती, समानसंधी आणि आपले हक्क मिळावे यासाठी अमेरीकेत महिलांनी 8 मार्च 1909 मध्ये निदर्शने केली होती. यानंतरही अनेक आंदोलने होत गेली. संयुक्त राष्ट्र संघटनेने 8 मार्च 1996 पासून जागतिक महिला दिन साजरा करण्यास सुरुवात केली आहे. महिलांच्या प्रगतीवरच समाजाची प्रगती अवलंबून आहे. मानव विकास अंतर्गत महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. महिलांना त्याचा फायदा घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

 

तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणा-या महिला सरपंचाचा सत्कार करण्यात आला. यात शालिनी दोहतरे (सरपंच अंबोली, ता. चिमूर), निरंजना मडावी (आंबेधानोरा, ता. पोंभुर्णा), छाया जंगम (माजरी, ता. भद्रावती), शुभांगी राऊत (नानोरी, ता. ब्रम्हपुरी) आणि अमावस्या निमसरकर यांचा समावेश आहे. कार्यक्रमाच्या सुरवातीला दीप प्रज्वलन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.

 

कार्यक्रमाचे संचालन विद्या रामटेके यांनी केले. यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ग्रामस्तरावरील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.