बारदाना शिवून आईने मुलाला केले आयआयटी

बारदाना शिवून आईने मुलाला केले आयआयटी

 

बरेचदा अभावामुळे माणसातली जिगिषा जागरूक होते. ध्येयाने एखादया उददीष्टाचा पाठलाग करत असल्यास कोणतीच गोष्ट अशक्य नाही याचे अत्यंत प्रेरक उदाहरण म्हणजे सागर चांदेकर भंडारा जिल्हयातील साकोली तालुक्यातील सानगाव या छोटयाशा गावात चांदेकर ताई राहतात. सागर तीन वर्षाचा असतांना त्याचा वडीलांचा सर्पदंशाने मृत्यु झाला. दोन मुली व लहान मुलगा पदरात असतांना ताई दुख विसरून कामाला लागल्या. त्यांनी आधी मुलांच्या शिक्षणावर भर दिला. सप्टेंबर 2020 पासून त्यांनी महीला आर्थिक विकास महामंडळाच्या संलग्नीत लोकसंचालीत केद्राव्दारे महिलांना घेवून बारदाना निर्मीतीचे काम सुरू केले. त्यासाठी लागणारे साहीत्य हे रस्ते बनविणाऱ्या सिंमेट कंपनीकडून कच्चे साहीत्य घेतात.

 

भंडारा‍ जिल्हयात मोठया प्रमाणावर धान खरेदी होत असल्याने पिक साठवणुकीसाठी मोठया प्रमाणावर बारदाण्याला मागणी असते. त्यामुळे चांदेकर ताई सांगतात त्याप्रमाणे महीन्याकाठी 35 ते 40 हजार रूपये महीना आर्थिक उत्पनन होते. त्यांनी त्यांच्यासोबत आणखी 12 महीलांना रोजगार दिला आहे. या महिला ही नगाप्रमाणे बारदाणा शिवून नियमीत पगार त्यांना दिला जातो.

 

परिस्थीतीवर मात करून त्यावरच न थांबता त्यांनी मुलाच्या उच्च शिक्षणासाठी त्याला नागपूरला पाठवले. खासगी कोचींग क्लासची फी भरतांना आलेल्या अडचणीत बचतगटाच्या मिळणाऱ्या कर्जाने साथ दिली. आज सागर आयआयटी खडगपूरच्या मेटालीक इंजिनीयर पदवीच्या तीसऱ्या वर्षाला शिकत आहे. नुकतीच जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी शिवणी बांधला भेट दिली असता सागर याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व त्याच्या आईचे कौतुक केले.

शैलजा वाघ-दांदळे जिल्हा माहिती अधिकारी       भंडारा