पवनी येथील रोजगार मेळाव्यात 381 उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड

पवनी येथील रोजगार मेळाव्यात 381 उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड

 

भंडारा दि. 27 : पवनी येथे शिवाजी विज्ञान महाविद्यालयात आयोजित कौशल्य विकास विभागाद्वारे रोजगार मेळाव्यात 24 कंपन्यांनी 1600 पेक्षा जास्त पदासाठी मुलाखती घेतल्या. त्यापैकी 381 उमेदवारांची मुलाखतीद्वारे प्राथमिक निवड करण्यात आली.

 

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा, शिवाजी विज्ञान महाविद्यालय पवनी, एल.के. बालखंडे कला व वाणिज्य महाविद्यालय पवनी, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पवनी व लाखांदूर आणि संत जगनाडे महाराज (खाजगी) औद्योगिक प्रशिक्षण संस्था पवनी यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी पंडीत दिनदयाळ उपाध्याय भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन शिवाजी विज्ञान महाविद्यालय पवनी येथे करण्यात आले.

 

रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी उमेश खारोडे, मनोहरभाई पटेल अभियांत्रीकी महाविद्यालय शहापूरचे प्राचार्य डॉ. प्रल्हाद हरडे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोदिंयाचे सहायक आयुक्त रा. ना. माटे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडाराचे सहायक आयुक्त सुधाकर झळके, शिवाजी विज्ञान महाविद्यालय पवनीचे प्राचार्य डॉ.‍विजय लेपसे, एल. के. बालखंडे कला व वाणिज्य महाविद्यालय पवनीचे प्राचार्य डॉ. संजय नंदागवळी, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पवनी व लाखांदूरचे प्राचार्य बी. एन. तुमडाम, संत जगनाडे महाराज (खाजगी) औद्योगिक प्रशिक्षण संस्था पवनीचे प्राचार्य योगेश बावणकर, एमआयटी शहापूरचे शाहीद शेख, डॉ. संजय रायबोले समन्वयक रोजगार मेळावा विज्ञान महाविद्यालय बी. के. निबांर्ते आदि उपस्थित होते.

 

सहायक आयुक्त सुधाकर झळके यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये उद्योजक व उमेदवार यांचा समन्वय एकाच ठिकाणी रोजगार मेळाव्याच्या माध्‍यमातून करण्यात येतो. यामाध्यमातून उमेदवारांनी कंपनीत रुजू होवून प्रत्यक्ष अनूभव घ्यावे व त्याचा फायदा उमेदवारांना भविष्यातील पुढील वाटचालीसाठी नक्कीच होईल असे मार्गदर्शन केले. उमेश खारोडे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी भंडारा यांनी जीवनामध्ये शीस्तीचे पालन करुन आपले जीवन घडवावे असे मार्गदर्शन केले. डॉ. प्रल्हाद हरडे, प्राचार्य मनोहरभाई पटेल अभियांत्रीकी महाविद्यालय शहापूर यांनी आजचे युग हे कौशल्याचे युग असून ज्यांच्याकडे कौशल्य असेल त्यांना रोजगार हमखास मिळेल असे मार्गदर्शन केले. डॉ.‍विजय लेपसे प्राचार्य शिवाजी विज्ञान महाविद्यालय पवनी यांनी बदलत्या तंत्रज्ञानानुसार कौशल्य आत्मसात करण्याचे आवाहन केले.

 

रोजगार मेळाव्यामध्ये ऑफलाईन व ऑनलाईन 1882 उमेदवार उपस्थित होते आणि त्यांचे तज्ञ मार्गदर्शकाद्वारे उमेदवारांना समुपदेशन करण्यात आले. तसेच स्वयंरोजगार करणाऱ्या उमेदवारांकरीता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ भंडारा, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊसाठे विकास महामंडळ, इतर मागासवर्ग विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, यांच्या स्टॉलच्या माध्यमातून 385 उमेदवारांनी लाभ घेतला, असे सहायक आयुक्त सुधाकर झळके यांनी कळविले आहे.