यशकथा -6 मनरेगा योजनेअंतर्गत कुक्कुटपालन व्यवसायातून कुटुंबसमृध्दी

यशकथा -6 मनरेगा योजनेअंतर्गत कुक्कुटपालन व्यवसायातून कुटुंबसमृध्दी

 

लाखनी तालुक्यातील पुजा लांजेवार यांची यशकथा त्याच्या शब्दात…

 

मी पुजा वाल्मिक लांजेवार ग्रा.पं.कनेरी तालुका लाखनी येथील रहिवासी असून माझ्याकडे 0.30 एकर कोरडवाहू शेती आहे. मी धानपिकाच्या व शेतमजुरीच्या भरवश्यावर आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होते. माझ्या पतीचे एक लहान स्पेयर पार्टसचे दुकान आहे. परंतु आर्थिक वर्ष 2019-20 ते 2021-22 पर्यंत कोविड प्रादुर्भावामुळे दुकान बंद पडले. या परिस्थितीत आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह कसा चालवायचा हा गंभीर प्रश्न माझ्यापुढे निर्माण झाला होता.

 

कोविड काळात फक्त शेती व शेती पूरक व्यवसाय करण्याची सूट होती. घरी राहून युट्युब च्या माध्यमातून शेती पूरक व्यवसाय विषयी माहिती घेतली. माझ्याकडे काही गावरान कोंबड्या होत्या. मी मुक्त संचार पद्धतीने कुक्कुटपालन सुरु करण्याचा विचार केला. माझ्याकडे कोंबड्याना ठेवण्याकरिता फक्त 10X 10 इतकी एक स्टोअर रूम शेतावर होती. त्यात मी कुक्कुटपालन करण्यास सुरवात केली. कुक्कुटपालन करतांना माझ्याकडे पक्षांची संख्या सतत वाढत गेली त्यामुळे पक्षांना रात्रीच्या वेळेस ठेवण्यास अडचण निर्माण झाली. त्याच काळात नरेगा योजनेअंतर्गत कुक्कुट पालन शेड मिळू शकते याबाबत मला ग्राम रोजगारसेवक, सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडून माहिती मिळाली. याबाबत मी स्वतः तालुक्याचे गट विकास अधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेतली. गट विकास अधिकारी यांनी तातडीने कुक्कुटपालन शेडचा प्रस्ताव तयार करण्यासंबंधी ग्रामपंचायतीस निर्देश दिलेत. त्यानुसार यापूर्वी पार पडलेल्या ग्रामसभेमध्ये कुक्कुटपालन शेड घेण्यासंबंधी माझे नाव समाविस्ठ करण्यात आले होते.

 

त्यानुसार ग्रामपंचायतीने निर्देशित केल्याप्रमाणे संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता माझ्याकडून करण्यात आली. त्यानुसार प्रस्ताव तयार करून ग्रामपंचायतीने तो तांत्रिक व प्रशासकीय मान्यताकरिता पंचायत समितीकडे सादर केला. त्यानुसार गट विकास अधिकारी यांच्या स्तरावरून त्यास प्रशासकीय मान्यता देऊन मी आपल्या कुक्कुट पालन शेडचे काम सुरु केले. कुक्कुट पालन शेड प्रक्रियेत माझे पती यांचे मला मोलाचे सहकार्य लाभले.

 

मला आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये कुक्कुट पालन शेड देण्यात आलेत्यानुसार जुलै 2021 मध्ये कुक्कुट पालन शेडचे काम पूर्ण झाले. त्यानंतर मी मुक्त संचार पद्धतीने ‘कुक्कुटपालन करण्यास सुरवात केली. माझ्याकडे त्याकाळात 100 पक्षी होते. माहे जुलै, 2021 पासून पुढील 8 महिन्यात मी गावरान कोंबड्याची पूर्णपणे वाढ झाल्यावर मी त्या विकण्यास सुरवात केली. कोरोना काळात समतोल आहारासाठी अंड्याची मागणी वाढली त्याचबरोबर मी 700 गावरान अंडी मी विक्री केले. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये आता मागील 4 महिन्यात 100 कोंबडी पक्षी मी विक्री केले आहे. त्याच सोबत 200 अंडी सुद्धा विक्री केले आहे..

 

मला यापुढे कुक्कुट पालन शेडमधून झालेला फायदा पाहून विस्तारित स्वरूपाचे कुक्कुट पालन शेड तयार करावयाचे आहे. पक्षांच्या प्रजातीनुसार छोटे-छोटे शेड तयार करून कुक्कुट पालन करावयाचे आहे. वर्षाला निश्चितच 4 लाख रुपयाचे उत्पन्न (जवळपास 1000 कोंबडी पक्षी व 10 हजार अंडी विक्रीतून) घेण्याचा माझा मानस आहे.

 

महामारीच्या काळात उदर निर्वाहासाठी कुक्कुट पालन व्यवसाय आमच्यासाठी वरदान ठरलेला आहे. पतीचे दुकान बंद झाल्याने उभा ठाकलेल्या प्रसंगातून सामोरे जाता आले. कुक्कुट पालन शेड नरेगा योजनेतून मिळाल्यामुळे चांगल्या प्रतीचे कोंबडीपक्षी व अंडी तयार झालीत. आमच्यासाठी नरेगा योजना हि वरदान ठरली आहे.

 

शैलजा वाघ दांदळे,

जिल्हा माहिती अधिकारी, भंडारा