शाळा /महाविदयालयातच विदयार्थ्यांना आजपासून मिळणार दाखले प्रशासनाचे सकारात्मक पाऊल

प्रजासत्ताक दिनी विदयार्थ्याना तीन हजारावरून अधिक दाखल्याचे वाटप

शाळा /महाविदयालयातच विदयार्थ्यांना आजपासून मिळणार दाखले प्रशासनाचे सकारात्मक पाऊल

 

भंडारा, दि 27 : विदयार्थी शिकत असलेल्या शाळा-महाविदयालयातच त्यांना आवश्यक ते दाखले मिळण्यासाठी केलेल्या उपक्रमाची आज जिल्हाभरात अमंलबजावणी झाली असुन आज एकुण 3459 दाखले वाटप करण्यात आले आहेत.

 

शालेय व महाविदयालयीन विदयार्थ्याना शैक्षणीक संस्थेतील प्रवेशासह अनेक कारणासाठी जात प्रमाणपत्र, अधिवासी (डोमिसाईल), नॉन-क्रिमीलेयर, उत्पनाचे प्रमाणपत्र यासह अन्य दाखले गरजेचे असतात. हे लक्षात घेता इयत्ता 8 वी ते 10वीच्या विदयार्थ्याना ते शिकत असलेल्या शाळा महाविदयालयामध्येच हे दाखले उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.त्यानुसार तालुकास्तरीय समीती गठीत करण्यात आली. त्यानुसार आज प्रजासत्ताक दिनी एकुण 3459 दाखले वाटप करण्यात आले.

 

यामध्ये 785 जात प्रमाणपत्र, 2415 डोमीसाईल, 156 नॉन-क्रिमीलेयर तर 103 उत्पन्नाचे दाखले वाटण्यात आले. जिल्हयातील सात तालुक्यातील 381 शाळा-महाविदयालयात इयत्ता आठवी ते बारावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेतच दाखले देण्याची प्रक्रीया आजपासून सुरू झाली. शैक्षणिक सत्रापूर्वीच कृती आराखडा तयार करून त्याव्दारे विदयार्थ्याना जानेवारी महीन्यापासूनच हे दाखले उपलब्ध करून दिल्याने पुढील शैक्षणिक सोयी-सुविधेकरीता अडचण निर्माण होणार नाही. हे लक्षात घेवूनच डिसेंबर महीन्यात यादृष्ट्रीने जिल्हा प्रशासनाने कृती आराखडा राबविला. त्यामध्ये विभाग प्रमुखांना जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानुसार तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी इयत्ता आठवी ते बारावीच्या मुख्याध्यापकांच्या सभा डिसेंबर महिन्याच्या 12 तारखेपासून घेतल्या. मुख्याध्यापकांनी 25 डिसेंबरपासून जात प्रमाणपत्र व इतर दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्र गोळा केली. तसेच तहसीलदारांनी नेमून दिलेल्या सुविधा केंद्र चालकांनी शाळेत जाऊन उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे महाऑनलाईन संकेतस्थळावर परिपूर्ण अर्ज पाच जानेवारीपर्यंत सादर केले. त्यानंतर 25 जानेवारीपर्यंत उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी महाऑनलाईन प्रणालीवर कार्यवाही केली व पूर्ण प्रक्रियेनंतर तालुकास्तरीय समिती सदस्य व इतर शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत 26 जानेवारी रोजी पहील्या टप्प्यात 3459 दाखले वाटप करण्यात आले.