तेजस्वीचा प्रण , नितीश-मोदींना दम

बिहारात प्रचाराला रंग चढला. फायनल १० ला होणार. सध्या तिथं शब्द युध्दाचे रण माजले. यात तेजस्वी-राहुल उतरले . विरोधात साठीपार नरेंद्र मोदी व नितीश कुमार. दीर्घ अनुभव गाठीला . सोबतीला नागपुरी सल्लागार. या सर्वांना बिहारच्या भूमितून ललकारतो. ३१ वर्षाचा तरुण . कुठनं आली ऊर्जा. कशात आहे याचे गुढ ? ते दंडलयं सत्यात. त्यावर पडदा आहे. सरकारची लपवाछपवी . मीडियाही गप्प. बेकारांच्या आत्महत्या वाढल्या. शेतकरी आत्महत्याचे आकडे मागे पडले. बोलणार कोण ? तेजस्वी यादव तरुण . त्यांनी बरोबर हेरलं. बिहारची लोकसंख्या १२ कोटी. मतदार ७ कोटी १८ लाख . यात १८ ते ३९ वयोगटातील मतदार ३ कोटी ६६ लाख ३४ हजार. तरूण मतदारांची टक्केवारी ५१ . कोरोना संकटात ४० लाखांवर प्रवासी मजूर परतले. नितीशने केला त्यांच्या परतीला विरोध. त्याला कोणी जुमानलं नाही. बिहारी मजूर उपासी. पायी निघाले. रक्तंबंबाळ झाले. तरी थांबले नाहीत. कडेवर मुलं. डोक्या, खाद्यांवर संसाराचे गाठोडे. सायकल किंवा मिळेल ते साधन. वाटेत उपासमार. वरून पोलिसाच्या लाठ्या. तहानेने व्याकूळ. कसे तरी गाव गाठले. तेव्हाच त्यांनी प्रण केला. नितीशला धडा शिकविण्याचा.

प्रण किया है….

प्रण हा बिहारी शब्द. अनेकांच्या जिव्हारी लागला. हा शब्द तेजस्वीने उचलला. त्याचा दोन ठिकाणी वापर केला. प्रण किया है. १० लाख नोकरी देनेका. दुसरा प्रण नितीश को सत्ता से भगाने का. हाच प्रण बिहारी तरूणांनी केला. तो आता घराघरात गेला. बिहारी जनतेचा आवाज बनला. वाढती बेकारी ही ज्वलंत समस्या. तेजस्वींनी बेकारी मुद्दा बनविला.भाजप-जेडीयूची कोंडी केली. राजद-काँग्रेसने निवडणुकीचा अजेंडा निश्चित केला. ९ नोव्हेंबर तेजस्वी यादव यांचा जन्मदिन. त्याच दिवशी लालूप्रसाद यांच्या जामीनावर अंतिम सुनावणी. १० नोव्हेंबरला मतमोजणी. तेजस्वीने दहा या आकड्यावर फोकस केला. अन् तेजस्वी गरजले.
हम बिहारी.
प्रण करते.
उसे पुरा करते.
करते है ना?
गर्दीला विचारतो. होकारचे लाखों स्वर एका आवाजात घुमतात. हां… हां…
तो पक्का समजो.
९ तारिक को लालूजी आनेवाले है.
१० को नितीश कुमार जानेवाले है. मुख्यमंत्री शपथ के बाद, पहिला साईन होगा. १० लाख युवाओं को नोकरी. क्या बोला …$$$. गर्दीतून आवाज घुमतो. १० लाख नोकरी…सोबत तेजस्वी जिंदाबाद. तेजस्वी आगे बढो. हम तुम्हारे साथ है. च्या घोषणा सुरु होतात. सभा जिंकतो. निरोप घेत पुढच्या सभेकडे कूच. माहौल बनतो. हा मुद्दा हिट होतो. राजकारणाच्या सारीपाटावर तेजस्वी हिरो ठरतो.

मोदींवर प्रश्नांचे बाण…

आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपुरात विजयादशमी मेळावा घेतला. त्यात मोदी धोरणांची स्तुती केली. देश योग्य दिशेने जात आहे. असंही ते म्हणाले. विरोधी पक्ष टीका करतं. सारं चौपट केल्याचा आरोप आहे. नरेंद्र मोदी सत्तेवर आले. अच्छे दिन आनेवाले है. काला धन लायेगे. सबके जेब में १५ लाख और हर साल दो करोड नौकरी. यातील काहीच झाले नाही. उलट दोन कोटींवर तरुणांच्या नोकऱ्या गेल्या. सरकारी उपक्रम कुंबेराच्या दावणीला बांधले. रेल्वे विकल्या. विमानतळ विकले. विकणे सुरुच आहे. हे लोक बघत आहेत. हे सर्व संघाला मान्य आहे असे म्हणावं लागेल. बिहारात मोदी धोरणाला विरोध आहे. त्यात भर नितीश चाचानी घातली. कोरोना काळात घरात बसले. निवडणुका लागल्यावर घरा बाहेर पडले. लोकांना वाटलं. ये नितीश बा, काम का नाय! नितीश हटावला जोर चढला. त्यात तेल ओतलं. चिराग पासवान यांनी. नितीश नही चाहिये. म्हणतात ना, वाईट दिवस आले की घराचे वासे ही फिरतात. नेमकं तसचं घडलं. एनडीए मधून पासवान यांची लोजपा बाहेर पडली. ताल ठोकत जाहीर केलं. हम भाजप के साथ. नितीश के खिलाप. नितीशच्या जेडीयू पक्षाच्या विरोधात उमेदवार उतरविले. नितीश-भाजप एकत्र मैदानात उतरले. मात्र हवा वेगळीच .हवेचा कल भाजपनं ओळखलं. आपल्या जाहिरातीतून नितीशकुमार यांना बाद केलं. जाहिरातीत फक्त मोदींना ठेवलं. मुख्यमंत्री पदाचा उमेदवार. ज्यांच्या नेतृत्वात निवडणुका लढण्याची घोषणा. त्या नेत्याचा छायाचित्र नाही. हा तेजस्वी-चिराग या तरुणांचा पहिला विजय . पहिल्या टप्प्यात आज २८ ऑक्टोंबरला ७१ जागांसाठी मतदान आहे. मतदान केंद्र सजले. सकाळी मतदान आरंभ झाले. स्थानिक नेते कामाला लागले.नेत्यांच्या तोेफा आता दुसऱ्या टप्प्यातील मतदान क्षेत्रात गरजू लागल्या. शालिनतेसाठी ओळखले जाणारे नितीश घसरले. किमान दहा सभांमध्ये धमकी वजा बोलले. शिवाय तेजस्वीचे शिक्षण काढले. दिल्लीला कुठे जातो .सबकुछ पत्ता है.असे शब्दबाण सोडले. लालू-राबडी इतिहास पठण. कितने बच्चे पैदा करते. या पर्यंत गेले. तेजस्वी शब्द मर्यादा पाळतो.मोदीजी किती भावडं आहेत ? प्रश्न विचारून बोलणं टाळतो. त्यांचे शब्द आशीर्वचन समजतो असं म्हणून समजसं राजकारणी असा कृतीतून संदेश देतो. हिंसाचाराने गाजणारी बिहारची निवडणूक शब्दांनी गाजत आहे. आता मतदानाचे दोन टप्पे बाकी आहेत. काँग्रेस मात्र प्रचारात पिछाडीवर आहे. नेते यास झारखंड पँटर्न म्हणतात. गाफिल प्रचाराचे नवे तंत्र म्हणून सांगतात. त्या तुलनेत लोजपा प्रचारात आपलं अस्तित्व दाखविताना दिसते.

मेक इंन इंडिया फेल

भाजपची केंद्रात सत्ता आली. मोदी पंतप्रधान झाले. तेव्हापासून अनेक घोषणा झाल्या.त्या हवेत विरल्या. केवळ कागदावर राहिल्या. मेक इंन इंडिया. स्टार्ट अप इंडिया. स्किल इंडिया. स्वच्छ भारत. कुठेच दिसत नाही. देशात सातशेवर अभियांत्रिकी कॉलेज. गेल्या सहा वर्षात ५६ लाखांवर तरुणांनी अभियांत्रिकी पदवी घेतली. त्यापैकी ३६ लाखांवर बेकार आहेत. सहा वर्षात सुमारे १७ लाखांना रोजगार मिळालं. बहुतेक खासगी कंपन्यांत. त्यात सरासरी वेतन ८ ते १२ हजार . अनेकांचा वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयाच्या आंत. बाकीच्याचे रिकामे हात.

तरुणांच्या आत्महत्येत वाढ

आतापर्यंत शेतकरी आत्महत्या हा चिंतेचा विषय होता. त्या आत्महत्या सुरुच आहेत.त्यामध्ये चिंतेची नवी भर पडली. २०१६ पासून तरुणाच्या आत्महत्या वाढल्या .२०१५ मध्ये एकूण आत्महत्यांपैकी १२,६०२ शेतकरी आत्महत्या होत्या. तर तरुण बेकारांच्या आत्महत्या १०,९१२ होत्या .२०१७- १८ मध्ये बेकारांच्या आत्महत्या वाढल्यात. सरकारी नोंदीनुसार अलिकडे एकूण आत्महत्यांपैकी ८.७ टक्के आत्महत्या शेतकऱ्यांच्या आहेत. तर तरुण बेकारांच्या आत्महत्येचे प्रमाण ९.४ टक्क्यांपर्यंत वाढलं .गतवर्षी १८ ते ४५ वयोगटातील तरुणांच्या आत्महत्या वाढल्या. ही वाढ चिंता वाढविणारी. सरकारची धोरणं चुकली की अर्थव्यवस्था कोलमडली. या मुद्दांवर बोललं जात नाही. बिहारात बेकारी सर्वाधिक .शंभरात १० बेकार. तेजस्वीच्या मते ४३ टक्के बेकारी.

राजदचा नोकरींचा वादा

राष्ट्रीय जनता दलाने आपला निवडणूक अजेंडा तयार केला. तेव्हा हे सर्व मुद्दे गृहित धरले. राजदच्या पोस्टरवर केवळ तेजस्वी यादव आहेत. भाजप- जेडीयूने लालू यादव यांचा १५ वर्ष जंगल राज आणि नितीश कुमार यांचा १५ वर्षाचा सुप्रशासन राज असा थाटात प्रचार केला. राजदला हा अंदाज असावा. त्यामुळे लालू-राबडी पोस्टरवर नाहीत. प्रचारातही राबडीदेवी, सीमा भारती दिसत नाही. केवळ तेजस्वीवर फोकस . ही रणनीति यशस्वी होताना दिसते. प्रचारात तेजस्वीने आघाडी घेतली. नितीश-भाजप पिछाडीवर . तेजस्वी मोदींसह सर्वांवर भारी असे चित्र आहे. नितीश तुरुपचा पत्ता फेल ठरला.
भाजप बँकफुटवर गेली.सावरासावर म्हणून १९ लाख रोजगारांची घोषणा केली. जाहिरात, पोस्टरवरून नितीशला हटविले. मोदीच्या नावावर मताचा जोगवा सुरु केला. मीडियाचा एकतर्फा विजयाचा सर्वे होता. तो आपटला.आता सर्वे घेता येत नाही. मीडियात आता नव्या खेळी. महिला काय म्हणतात. तरुणी काय म्हणतात. गाववाले काय म्हणतात , नितीश को गुस्सा क्यो आता. असे नवे फंडे सुरु झाले. तेजस्वी यादव नोकऱ्यांवर बोलतो. भ्रष्टाचारावर विचारतो. उद्योग, बेकारीवर भाजप-जेडीयूला घेरतो. पँकेज, जुन्या घोषणाचं काय झालं. अशी प्रश्नांची झडी लावतो. लोकांच्या टाळ्या घेतो. नितीश कुमार यांच्यावर दुहेरी मार चालू आहे. लोजपा नेते चिराग पासवान यांचा बिहारी फस्ट हँशटँग आहे. नितीश को हटाना है. दोघेही नवशिके राजकारणी. त्यांना गांभीर्याने घेतले नाही. आता त्यांचा अनेकांना पस्तावा दिसतो. सुशांत राजपूत प्रकरण होतं. ते फुसं झालं. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवडणूक प्रमुख नेमलं.ते कोरोनात अडकले. मात्र या निमित्ताने राष्ट्रीय राजकारणात ओळख मिळते. अगोदर हे काम नितीन गडकरींकडे सोपवित. त्यांना आता आराम दिला जातो. बिहारचा निकाल काय लागतो. याकडे सर्वांचे लक्ष आहे. ही पहिली निवडणूक दिसते. मोदी-मोदीच्या नावाचा गजर नाही. निवडणूक तरुणांभोवती फिरत आहे. निकाल धक्कादायक राहतील. गडबडीची भीती आहे. आयोगाची कसोटी आहे. राजकारणात नकाराही हात दाखवितो. अन् ज्याच्यावर भरवशा दाखवा त्यापासून धोका होऊ शकतो. हे बिहार निवडणूकीचे संकेत . राजकारणात कोणाला कमजोर लेखू नये म्हणतात. त्याची प्रचिती येत आहे. हे निकालात बदलेल काय ? यासाठी दहा नोव्हेंबरपर्यंत थांबावे लागेल.
-भूपेंद्र गणवीर
…………….BG………………..