भंडारा : जिल्ह्यात न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन (पीसीव्ही) लसीकरण शुभारंभ  

जिल्ह्यात न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन (पीसीव्ही) लसीकरण शुभारंभ  

  • जिल्ह्यात 128 ठिकाणी लसीकरण

भंडारा,दि.13:- भंडारा जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार न्युमोकोकल आजारांपासून बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन (पीसीव्ही) या लसीचा नियमित लसीकरण कार्यक्रमामध्ये समावेश करण्यात आला असून आज 13 जुलै 2021 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र मोहदुरा अंतर्गत उपकेंद्र गणेशपूर येथे जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन (पीसीव्ही) लसीकरण जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमात उद्घाटक म्हणून पंचायत समिती भंडारा माजी सभापती श्रीमती वर्षा साकुरे, अध्यक्ष म्हणून गणेशपूरचे सरपंच मनिष गणविर तर प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, जिल्हा माता बाल संगोपण अधिकारी डॉ. माधुरी माथुरकर, उपसरपंच धनराज मेहेर, यशवंत साकुरे, बाळु साकुरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद मोटघरे, डॉ. कविता कविश्वर, डॉ. लांजेवार, विस्तार अधिकारी श्री. बिलवने, देवानंद नागदेवे, शेषमंगल नान्हे उपस्थित होते.

न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन (पीसीव्ही) लसीकरणाबाबत डॉ. माधुरी माथुरकर यांनी न्युमोकोकल आजार काय आहे, न्युमोकोकल न्युमोनिया म्हणजे काय, न्युमोकोकल बॅक्टेरियामुळे कोणते आजार होतात व त्याची लक्षणे काय आहेत, न्युमोकोकल आजार कसा पसरतो, न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन (पीसीव्ही) लसीकरणाचे फायदे काय आहेत याबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मोहदुरा येथील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे संचालन व आभार जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी चंद्रमणी मेश्राम यांनी मानले.

उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे आमदार राजू कारेमोरे यांच्या हस्ते न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन (पीसीव्ही) लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.