औद्योगिक क्षेत्रातील अंमलनाला पर्यटन स्थळ नागरिकांचे केंद्रबिंदू होणार – पालकमंत्री वडेट्टीवार Ø करमणूक केंद्र व पर्यटन विकास कामांचे भुमिपूजन

औद्योगिक क्षेत्रातील अंमलनाला पर्यटन स्थळ

नागरिकांचे केंद्रबिंदू होणार – पालकमंत्री वडेट्टीवार

Ø करमणूक केंद्र व पर्यटन विकास कामांचे भुमिपूजन

चंद्रपूर,दि. 2 जुलै :  जिल्ह्यातील राजूरा, गडचांदूर हा भाग औद्योगिक प्रगत मानला जातो. एवढेच नाही तर सांस्कृतिक, नैसर्गिक, ऐतिहासिक वारसा सुध्दा या क्षेत्राला लाभला आहे. एकीकडे उंच पहाड, दुसरीकडे पाणी आणि त्याच्या मधोमध अंमलनाला पर्यटन स्थळ आहे. पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत या भागाचा कायापालट झाल्यावर हे स्थळ नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू होणार, यात कुठलीही शंका नाही, असे मत राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.

गडचांदूर येथील अंमलनाला प्रकल्पाअंतर्गत करमणूक केंद्र व पर्यटन विकास कामांचे भुमिपूजन करतांना ते बोलत होते. यावेळी खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, राजूराचे नगराध्यक्ष अरुण धोटे, गडचांदूरच्या नगराध्यक्षा सविता टेकाम, प्रकाश देवतेळे आदी उपस्थित होते.

पर्यटन स्थळाचा विकास करण्यासाठी लोकप्रतिनिधींकडे उत्कृष्ट दृष्टी असावी लागते. ती दृष्टी येथील आमदार सुभाष धोटे यांच्याकडे सुरवातीपासूनच आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात जंगल, पाणी, उद्योग, निसर्ग सर्व मुबलक प्रमाणात आहे. येथेच पर्यटन विकासाला चालना दिली तर जिल्ह्यातील लोक पर्यटनासाठी बाहेर जाणार नाही. जिल्ह्यात एका भागात धान, दुस-या भागात कापूस, तिस-या भागात सोयाबीनचे पीक होते. या कृषी समृध्दीसोबतच काही तालुक्यांमध्ये मोठमोठे औद्योगिक कारखाने आहे. तर येथील सुंदर निसर्ग नागरिकांना आकर्षित करतो. त्यामुळे निसर्गाने नटलेला चंद्रपूर जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या सर्वांगीन विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. अंमलनाला पर्यटन स्थळाकरीता आतापर्यंत 4.90 कोटी रुपये देण्यात आले आहे. निधीची आणखी गरज पडल्यास त्वरीत उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.

खासदार श्री. धानोरकर म्हणाले, या क्षेत्रात मोठमोठे उद्योग आहेत. नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी तसेच बच्चे कंपनीकरीता पर्यटनाच्या माध्यमातून करमणुकीचे साधन तयार होणे आवश्यक आहे.

पर्यटनाकरीता निधी खेचून आणण्यात जिल्ह्याचे पालकमंत्री आणि येथील आमदार तसेच जिल्हा प्रशासनाचे सहकार्य नेहमीच मिळते, असे त्यांनी सांगितले. आमदार श्री. धोटे म्हणाले, या परिसरात चार मोठे सिमेंट उद्योग आहेत. येथील मुलांना खेळण्यासाठी तसेच नागरिकांना पर्यटनासाठी हा प्रकल्प आवश्यक आहे, तर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, कंत्राटदाराने हा प्रकल्प त्वरीत पूर्ण करावा. आमदारांच्या पाठपुराव्यामुळेच एक चांगले पर्यटन स्थळ विकसीत होत आहे.

प्रास्ताविकात कार्यकारी अभियंता श्री. काळे यांनी सांगितले की, तीन टप्प्यात या पर्यटन स्थळाचा विकास होणार आहे. धबधब्याकडे जाण्यासाठी दोन कोटींचा रस्ता तर करमणूक पार्क करीता सात कोटी मंजूर आहे. यापैकी 4.90 कोटी प्रशासनाने उपलब्ध करून दिले आहे. प्ले ग्राऊंडपासून ते बोटींगपर्यंत सर्व सुविधा येथे तयार करण्यात येतील, असे श्री. काळे यांनी सांगितले.

यावेळी गडचांदूर मुख्याधिकारी विशाखा शेळके, कार्यकारी अभियंता एस. बी. काळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.