chandrapur I कोविड लसिकरण बहुमाध्यमी जनजागृती व्हॅन चंद्रपूरात दाखल

कोविड लसिकरण बहुमाध्यमी जनजागृती व्हॅन चंद्रपूरात दाखल

Ø कोरोना लसिकरण व आत्मनिर्भर भारत अभियान जनजागृती मोहिमेला आज पासून सुरूवात

Ø माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणेच्या अधिनस्त क्षेत्रिय लोकसंपर्क ब्युरो, नागपूरचा उपक्रम

चंद्रपूर, दि.2: कोविड-19 लसिकरण आणि आत्मनिर्भर भारत अभियान या विषयावर नागपूर विभागातील चंद्रपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यात जनजागृतीसाठी तयार केलेल्या बहुमाध्यमी मोबाईल व्हॅन चंद्रपूर जिल्ह्य़ात दाखल झाली आहे. या फिरते प्रदर्शन आणि कलापथकाच्या माध्यमातून उद्या सोमवार (दि.३ मे) पासून चंद्रपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील गावांमध्ये नागरीकांमध्ये कोरोना लसिकरण विषयी जनजागृती करण्यात येणार आहे.

माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणे यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यात जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ आणि आरोग्य विभाग, महाराष्ट्र यांचे सहकार्य लाभले आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील ३६ जिल्हयात १६ व्हॅन्स द्वारे फिरते बहुमाध्यमी प्रदर्शन आयोजित करून तसेच कलापथकांच्या माध्यमातून लोकांमध्ये कोविड-19 लसिकरण मोहिम आणि आत्मनिर्भर भारत अभियानाबद्दल जनजागृती निर्माण करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, नागपूरच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावांमध्ये २० दिवस व्हॅनद्वारे फिरते बहुमाध्यमी प्रदर्शनाच्या माध्यमातून ही मोहिम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत लसिकरणाबाबतची माहिती, आत्मनिर्भर भारत अंतर्गत विविध उपक्रम आणि कोविड-19 विषयक नियमांबाबतची माहिती जिल्ह्यातील नागरीकांपर्यंत पोहचविणे, हा या मागील उद्देश आहे. लसिकरणाविषयी असलेले गैरसमज आणि अफवांबाबत जनतेला जागृत करणे, आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती फिरत्या बहुमाध्यमी प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांना करून देण्यात येणार आहे.

यावेळी कलापथकातील कलाकारांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे सादरीकरण करून लोकांपर्यंत जनजागृती संदेश पोहचविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जनजागृती मोहिमेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्‍हा माहिती कार्यालय यांचे सहकार्य लाभले आहे.

या मोहिमेच्या यशस्वितेसाठी प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणेचे संचालक प्रकाश मकदुम यांच्या मार्गदर्शनात सहायक संचालक निखील देशमुख, क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, तकनीकी सहायक संजय तिवारी, श्रीमती संजीवनी निमखेडकर,जी नरेश आणि सुभेदार रामजी बहुउद्देशिय संस्था, चंद्रपूर, श्रीकृष्ण बहुउद्देशिय संस्था, यवतमाळ, नवचैतन्य बहुउद्देशिय संस्था परिश्रम घेत आहेत.