chandrapur I पिगीबँक मधील पैसे प्रशासनाला देऊन अन्वितीने साजरा केला वाढदिवस

पिगीबँक मधील पैसे प्रशासनाला देऊन अन्वितीने साजरा केला वाढदिवस
८ वर्षीय मुलीच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक

सावली : देशात कोरोनाने मृत्यूचे तांडव सुरु असल्याने वाढदिवस साजरा न करता आपल्या पिगीबँकमधील रक्कम जिल्हा प्रशासनाला देत अन्विती सुरज बोम्मावार हिने आपला वाढदिवस साजरा केला. छोट्याशा वयात अन्वितिने केलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीसुद्धा तिने कोरोनासाठी आपल्या पिगीबँक मधील जमा रक्कम दिली होती.
सावली येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते सुरज बोम्मावार यांची कन्या अन्विती दरवर्षी आपला वाढदिवस 23 एप्रिलला आपले कुटुंबीय व मित्रपरिवारांच्या उपस्थितीत साजरा करते. मात्र मागील वर्षीपासून देशात कोरोनाने शिरकाव केला. जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट सुरु आहे. मृतकांचा आकडा वाढत आहे. प्रशासन आपल्या परीने प्रयत्न करीत आहे. परंतु निधीची कमतरता भासत आहे. त्यामुळे अन्वितीने आपला वाढदिवस साजरा न करता पिगीबँकमधील रक्कम मदत म्हणून देण्याची ईच्छा आपल्या वडिलांजवळ व्यक्त केली. त्यांनासुद्धा आपल्या छोट्याश्या मुलीच्या निर्णयाचे कौतुक करीत तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या हाताने आपत्ती व्यवस्थापण सहायता निधीसाठी तीन हजार रुपयांचा धनादेश सावलीचे तहसीलदार परिक्षित पाटील, नायब तहसील सागर कांबळे यांच्याकडे सुपूर्द केला. तहसीलदारांनी तिच्या या निर्णयाचे कौतुक करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे मागील वर्षी सुद्धा तिने कोविडसाठी मदत केली होती.