भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळयासाठी जागेची निश्चीती, परिसराचे सौंदर्यीकरण होणार
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने निघाला तोडगा.
चंद्रपूर शहरातील रेल्वे स्टेशन नजिकच्या भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळयाच्या स्थानांतरणासाठी जागेची निश्चीती करावी व नविन जागेच्या ठिकाणी सौंदर्यीकरणाचे काम करावे अशा सूचना विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
दिनांक १६ मार्च रोजी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली या विषयासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली. या बैठकीला आ. सुधीर मुनगंटीवार, पोलिस अधिक्षक श्री. साळवे, महापौर सौ. राखी कंचर्लावार, स्थायी समिती सभापती रवि आसवानी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त राजेश मोहीते, नगरसेविका चंद्रकला सोयाम, धनराज कोवे, डॉ. मंगेश गुलवाडे आदींची उपस्थिती होती.
ज्या जागेवर आधी पुतळा उभारण्यात आला होता त्या जागे शेजारीच नवी जागा निश्चीत करण्यात आली असल्याचे मनपा आयुक्त राजेश मोहीते यांनी सांगीतले. आदिवासी समाजाच्या सर्व प्रमुखांनी ती जागा मान्य असल्याचे सांगीतले. यासंदर्भात आवश्यक सर्व प्रक्रिया महानगरपालिकेच्या स्तरावर सुरू असल्याची माहिती राजेश मोहीते यांनी दिली.
नव्या जागेभोवती सौंदर्यीकरणाचे काम महानगरपालिकेने निश्चीत केले असून याकडे आपण जातीने लक्ष देणार असल्याचे महापौर सौ. राखी कंचर्लावार म्हणाल्या. जे.जे. स्कुल ऑफ आर्टने यापूर्वी मंजूर केलेले ड्राईंग तपासण्याच्या सूचना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मनपा आयुक्त राजेश मोहीते यांना दिले.