chandrapur I चंद्रपूर जिल्‍हयातील प्रस्‍तावित ग्रीनफिल्‍ड विमानतळासाठी वनजमिनी हस्‍तांतरणाचा प्रस्‍ताव मुख्‍यमंत्र्यांकडे फेरसादर करण्‍याचे वनराज्‍यमंत्री दत्‍तात्रय भरणे यांचे निर्देश.

  • चंद्रपूर जिल्‍हयातील प्रस्‍तावित ग्रीनफिल्‍ड विमानतळासाठी वनजमिनी हस्‍तांतरणाचा प्रस्‍ताव मुख्‍यमंत्र्यांकडे फेरसादर करण्‍याचे वनराज्‍यमंत्री दत्‍तात्रय भरणे यांचे निर्देश
  • आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या मागणीनुसार मंत्रालयात बैठक संपन्‍न.
     
    राजुरा तालुक्‍यातील विहीरगांव व मुर्ती येथे महाराष्‍ट्र विमानतळ विकास कंपनीकडून उभारण्‍यात येणा-या प्रस्‍तावित ग्रीनफिल्‍ड विमानतळासाठी वनजमिनी हस्‍तांतरणाचा प्रस्‍ताव मा. मुख्‍यमंत्र्यांकडे फेरसादर करावा असे निर्देश वन तसेच सामान्‍य प्रशासन राज्‍यमंत्री दत्‍तात्रय भरणे यांनी वनविभागाच्‍या उच्‍चाधिका-यांना दिले.
  • चंद्रपूर जिल्‍हयातील राजुरा तालुक्‍यातील विहीरगांव व मुर्ती येथे महाराष्‍ट्र विमानतळ विकास कंपनीकडून ग्रीनफिल्‍ड विमानतळ उभारणी संदर्भात वनजमिनींच्‍या हस्‍तांतरणाबाबत विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या विनंतीनुसार वनराज्‍यमंत्री दत्‍तात्रय भरणे यांनी आज मंत्रालयात बैठक बोलाविली होती. या बैठकीला महाराष्‍ट्रात विमानतळ विकास कंपनीचे श्री. दीपक कपूर, प्रधान मुख्‍य वनसंरक्षक (वन्‍यजीव) नितीन काकोडकर, मुख्‍य वनसंरक्षक मंत्रालय अरविंद आपटे आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
     
    या बैठकीत बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विषयाबाबत सविस्‍तर भूमीका विशद केली. सदर ग्रीनफिल्‍ड विमानतळ उभारणीच्‍या दृष्‍टीने  सामान्‍य प्रशासन विभागाने प्रस्‍तावित विमानतळाच्‍या विकासकामांना प्रशासकीय व वित्‍तीय मान्‍यता दिली आहे. वनजमिनी हस्‍तांतरणाचा प्रस्‍ताव नियमानुसार शासनाला सादर करण्‍यात आला आहे, परंतु हा प्रस्‍ताव व्‍यवहार्य नसल्‍याचे वनविभागाने म्‍हटले आहे. जिल्‍हयात सदर विमानतळाची उभारणी झाल्‍यास जिल्‍हयाच्‍या औद्योगिक विकासाला चालना मिळेल. या जिल्‍हयात आपण सैनिक शाळा उभारली आहे. त्‍यामुळे डिफेन्‍सशी संबंधित कार्यवाहीला सुध्‍दा यामुळे गती मिळेल. यादृष्‍टीने याबाबत फेरप्रस्‍ताव केंद्र शासनाकडे पाठविण्‍याची आवश्‍यकता आहे. याप्रकरणी राज्‍य शासनाने तातडीने कार्यवाही करण्‍याची मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली. सदर प्रकरणी त्‍वरीत फेरप्रस्‍ताव राज्‍य शासनाने केंद्र सरकारकडे मंजूरीसाठी पाठविण्‍याच्‍या दृष्‍टीने संबंधित नस्‍ती मा. मुख्‍यमंत्र्यांकडे पुनःश्‍च सादर करावी, आपण व्‍यक्‍तीशः मा. मुख्‍यमंत्र्यांना याबाबत विनंती करू असे वनराज्‍यमंत्री दत्‍तात्रय भरणे यांनी यावेळी सांगीतले.