Chandrapur I महिला व बालकांनी अत्याचाराविरूद्ध समुपदेशन केंद्राचा लाभ घ्यावा

महिला व बालकांनी अत्याचाराविरूद्ध समुपदेशन केंद्राचा लाभ घ्यावा.

चंद्रपूर, दि. 3 मार्च : महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारास प्रतिबंध करुन त्यांना संरक्षण व मदत उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने राज्य शासनमार्फत महिला समुपदेशन केंद्र चालविण्यात येतात. या समुपदेशन केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश टेटे यांनी केले आहे.

सदर समुपदेशन केंद्राद्वारे पोलीस स्टेशनला ज्या महिला व मुले येतात त्यांचे प्रश्न व्यवस्थितपणे ऐकूण त्यांना कायदेविषयक माहिती व मदत मिळवुन देण्यात येते. बहुतेक सर्व प्रकरणे सामाजिकदृष्ट्या महत्वाची असल्याने, पोलीसांना हे प्रश्न समजुन घेण्यास व सोडविण्यात बरीच मदत होते, म्हणजेच सदर कक्ष पोलीस स्टेशन व समस्याग्रस्त /पिडीत महिला व मुले या मध्ये दुवा म्हणून काम करतात. पिडीत महिला व गैरअर्जदार यांचे समुपदेशन करुन त्यांचेमध्ये समेट घडवून आणण्याचे कामही या समुपदेशन केंद्राद्वारे केले जाते.

वरील सेवा विनामुल्य असून यासाठी कोणतीही फी आकारली जात नाही. जर समाजकंटकांकडून पिडीत महिलेकडून आर्थिक मागणी केल्याचे निदर्शनास आल्यास कृपया जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जुना कलेक्टर बंगला, आकाशवाणीचे मागे, साईबाबा वार्ड, चंद्रपूर यांचेशी संपर्क साधावा, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश टेटे यांनी कळविले आहे.