Home Breaking News क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी सात वैद्यांची निवड

क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी सात वैद्यांची निवड

क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी सात वैद्यांची निवड

चंद्रपूर, दि. 03 : आदिवासी समाजातील पारंपरिक वैद्यकीय ज्ञानाला प्रोत्साहन देणे, पारंपरिक उपचार पद्धतींचे जतन करणे तसेच आदिवासी वैद्यांचे ज्ञान व कौशल्य अधिक समृद्ध करण्याच्या उद्देशाने आयसीएमआर-एनआयएचआर, भुवनेश्वर यांच्याकडून आयोजित जनहित कार्यक्रमांतर्गत 1 व 2 नोव्हेंबर 2026 रोजी हैदराबाद येथे आदिवासी वैद्यांच्या क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी चंद्रपूर प्रकल्पांतर्गत कार्यरत असलेल्या एकूण सात आदिवासी वैद्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये मनोहर कौरु मेश्राम, नायकू रामू कोडापे, परशुराम रामू कोडापे, मंगु माणिकराव येरमे, दिपक महादेव पेंदोर, मुकूल मनोहर मेश्राम व मनोज देवराव चांदेकर तसेच प्रकल्प कार्यालयातील नोडल अधिकारी मुखरू ताटलावार यांचा सहभाग होता.

या निवडीमुळे चंद्रपूर प्रकल्पातील पारंपरिक वैद्यकीय ज्ञान व आदिवासी समाजातील आरोग्यविषयक योगदानाला एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. सदर प्रशिक्षणाच्या माध्यमातून आदिवासी वैद्यांना त्यांच्या पारंपरिक ज्ञानाचा अधिक प्रभावी वापर करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन, कौशल्यवृद्धी व अनुभवांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळणार आहे. तसेच पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण, औषधी वनस्पतींचे महत्त्व आणि आरोग्यविषयक जाणीवजागृती याबाबतही प्रशिक्षण दिले आहे.

चंद्रपूर प्रकल्पांतर्गत सात आदिवासी वैद्यांची निवड होणे ही प्रकल्पासाठी गौरवास्पद बाब असून, या प्रशिक्षणामुळे आदिवासी समाजातील पारंपरिक वैद्यकीय ज्ञानाच्या संवर्धनास व विकासास चालना मिळेल, असे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी कळविले आहे.