चंद्रपूर जिल्हा ‘सुरक्षित प्लस’ करण्याचा संकल्प
Ø राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
चंद्रपूर, दि. 03 : एचआयव्ही/एड्स प्रतिबंध व नियंत्रणाच्या क्षेत्रात चंद्रपूर जिल्ह्याने संघर्षशील ते सुरक्षित श्रेणीपर्यंत महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. ही प्रगती कायम राखून जिल्ह्याला आता ‘सुरक्षित प्लस’ श्रेणीत नेण्यासाठी सर्व आरोग्य यंत्रणांनी समन्वयाने आणि अधिक प्रभावीपणे कार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (दि. 3) जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाच्या त्रैमासिक आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललितकुमार पटले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व संबंधित संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्ह्यात एचआयव्ही प्रतिबंध व नियंत्रणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी आढावा घेतला. एचआयव्ही बाधित व्यक्तींना शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ मिळवून देण्यासोबतच नियमित तपासणी, वेळेवर उपचार, समुपदेशन आणि जनजागृतीवर विशेष भर द्यावा. तसेच एचआयव्ही तपासणीचे प्रमाण वाढविणे, निदान झालेल्या व्यक्तींना तातडीने उपचारांशी जोडणे, नियमित औषधोपचार आणि व्हायरल लोड नियंत्रण यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
या सामूहिक प्रयत्नांमुळे चंद्रपूर जिल्ह्याने संघर्षशील ते सुरक्षित श्रेणीपर्यंत प्रगती केली असून, या कामगिरीची राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेच्या स्तरावर दखल घेण्यात आली. जिल्ह्याला राज्यस्तरावर प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या यशाबद्दल जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांचे अभिनंदन करून ‘सुरक्षित प्लस’चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन केले.
‘मिशन एड्स सुरक्षा’मुळे जिल्ह्याची उल्लेखनीय प्रगती : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात मागील तीन महिन्यांत ‘मिशन एड्स सुरक्षा’ अंतर्गत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, एआरटी केंद्रे, एकात्मिक समुपदेशन व तपासणी केंद्रे तसेच स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून एचआयव्ही प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमाला गती मिळाली.
नॅकोच्या 95-95-95 उद्दिष्टपूर्तीवर भर : राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेच्या (नॅको) 95-95-95 उद्दिष्टांनुसार एचआयव्हीसह जगणाऱ्या 95 टक्के व्यक्तींना त्यांच्या संसर्गस्थितीची माहिती असणे, निदान झालेल्या व्यक्तींपैकी 95 टक्के व्यक्तींना अँटिरिट्रोव्हायरल थेरपी उपचार मिळणे आणि उपचार घेणाऱ्यांपैकी 95 टक्के व्यक्तींमध्ये विषाणूचे प्रमाण नियंत्रणात आणणे अपेक्षित आहे. या उद्दिष्टांच्या पूर्ततेच्या दिशेने जिल्ह्यात नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात येत आहेत.
अतिजोखमीच्या गटांमध्ये जनजागृती : ‘मिशन एड्स सुरक्षा’ अंतर्गत एचआयव्ही तपासणीचा विस्तार, नवीन बाधित व्यक्तींचे निदान, इंडेक्स टेस्टिंग, समुपदेशन, एआरटी उपचारांशी जोडणी आणि व्हायरल लोड तपासणीवर विशेष भर देण्यात आला. तसेच ग्रामीण भागातील अतिजोखमीच्या गटांमधील नागरिक, स्थलांतरित कामगार, वाहतूक क्षेत्रातील कामगार आणि इतर संबंधित घटकांमध्ये एचआयव्ही प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यात आली.
संघर्षशील ते सुरक्षित हा प्रवास जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे. आता ‘सुरक्षित प्लस’चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नियमित तपासणी, उपचारांचे सातत्य, व्हायरल लोड नियंत्रण आणि व्यापक जनजागृतीवर भर दिला जाणार असल्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार यांनी सांगितले.
बैठकीला डॉ. स्नेहल कसारे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजिंक्य तांबाडे, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अखिल पडगेलवार, एआरटी केंद्राचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप मडावी, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत जोशी यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.







