प्रतिबंधित पदार्थ वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ
मुंबई, दि. १८ : आरोग्याला घातक असलेल्या प्रतिबंधित पदार्थांचा वापर आणि अशा पदार्थांची विक्री रोखण्यासाठी सतर्क रहावे, तसेच असे प्रकार आढळल्यास कठोर कारवाई करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले.
मंत्रालयात अन्न व औषध प्रशासन मंत्री झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली अन्न व औषध प्रशासन विभागाची आढावा बैठक झाली. यावेळी आयुक्त श्रीधर डुबे पाटील, सहआयुक्त (दक्षता) डॉ.राहुल खाडे, सहआयुक्त (अन्न) मंगेश माने उपस्थित होते.
अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले, प्रतिबंधित असलेल्या गुटखा व तत्सम पदार्थांची विक्री शाळा अथवा कोणत्याही परिसरात होणार नाही याची दक्षता संबंधित कार्यक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे. या दृष्टीने वेळोवेळी काटेकोर अंमलबजावणीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. अधिकारी यासंदर्भात अक्षम ठरल्यास त्यांच्यावर कारवाई केली ,जाईल असे अन्न व औषध प्रशासन मंत्री झिरवाळ म्हणाले.
नागरिकांना स्वच्छ आणि सकस आहार मिळावा तसेच उपहारगृह व हॉटेलच्या ठिकाणी अधिक चांगले वातावरण राहावे. या दृष्टीने लवकरच राज्यात अभियान राबविण्यात येणार असून यामध्ये चांगले काम करणाऱ्यांना गौरवण्यात येईल. यासाठी शहरांसह ग्रामीण भागात तालुकास्तरावर देखील नियोजन केले जावे. या दृष्टीने विभागाने कार्यवाही करावी, असे निर्देश मंत्री झिरवाळ यांनी दिले.









