महाराष्ट्रातील खासगी प्रसूती रुग्णालयांसाठी आरोग्य विभागाचा ‘लक्ष्य-मान्यता’ उपक्रम

महाराष्ट्रातील खासगी प्रसूती रुग्णालयांसाठी आरोग्य विभागाचा ‘लक्ष्य-मान्यता’ उपक्रम

मुंबई, दि. १० : राज्यातील खासगी प्रसूती रुग्णालयांमध्ये सेवा गुणवत्ता वाढवून प्रसुतीदरम्यान होणाऱ्या मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने “लक्ष्य-मान्यता” (LaQshya-Certification) हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.

हा उपक्रम राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांमध्ये दर्जात्मक, सुरक्षित आणि आदरयुक्त प्रसूती सेवा (Respectful Maternity Care) सुनिश्चित करण्यासाठी राबविण्यात येत आहे. महाराष्ट्राने मागील काही वर्षांत मातामृत्यू कमी करण्यामध्ये उल्लेखनीय प्रगती केली असून, आता हा प्रयत्न खासगी क्षेत्रापर्यंत विस्तारित करण्यात आला आहे.

“लक्ष्य-मान्यता” कार्यक्रमाचा मुख्य हेतू प्रसूतीदरम्यान माता आणि नवजात बालकांचे मृत्यूदर कमी करणे, खासगी रुग्णालयांमधील सेवा गुणवत्ता, रुग्ण सुरक्षा आणि रुग्ण काळजीत सुधारणा करणे, प्रत्येक महिलेला सुरक्षित व आदरयुक्त प्रसूती अनुभव मिळवून देणे आहे.

हा उपक्रम महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग, फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनॉकॉलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया (FOGSI) आणि Jhpiego या आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे.

Jhpiego संस्थेमार्फत फॉग्सी आणि खासगी रुग्णालयांना आवश्यक तांत्रिक सहाय्य, प्रशिक्षण आणि मूल्यांकन सहाय्य पुरविले जाणार आहे.