महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनीचा’: स्त्रीशक्तीचा गौरवः नवरात्रीत महिला कर्मचाऱ्यांच्या कार्याला सलाम !

महावितरणमध्ये सन्मान सौदामिनीचा‘: स्त्रीशक्तीचा गौरवः नवरात्रीत महिला कर्मचाऱ्यांच्या कार्याला सलाम !

नागपूरदि. 27 सप्टेंबर 2025: शक्ती, समर्पण आणि शौर्याची प्रेरणा देणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या मंगलमय पर्वात महावितरण कंपनीने आपल्या कर्तृत्ववान महिला अभियंता, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या असामान्य कार्याचा गौरव करण्यासाठी एका स्तुत्य उपक्रमाची घोषणा केली आहे. ‘वीज’ या मानवी जीवनाच्या मूलभूत गरजेच्या आणि जोखमीच्या तांत्रिक क्षेत्रात महिलांनी स्वतःला सक्षमपणे सिद्ध केले आहे. त्यांच्या याच महत्त्वपूर्ण योगदानाचा सन्मान करण्यासाठी ‘सन्मान सौदामिनीचा’ या विशेष कार्यक्रमाचे येत्या 1 ऑक्टोबर 2025 पर्यंत महावितरणच्या विविध कार्यालयांतून करण्यात येत आहे.

नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आदीशक्तीच्या नवरूपांची पूजा केली जाते. हा उत्सव म्हणजे स्त्री शक्तीचा, तिच्या विविध कलागुणांचा आणि तिच्यातील क्षमतेचा गौरव आहे. याच भावनेला अनुसरून, महावितरण कंपनीने कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा निर्णय घेतला आहे.

परिसंवादातून अनुभव कथन आणि संघर्षगाथा

हा सन्मान सौदामिनीचा’ कार्यक्रम केवळ औपचारिकता न राहता, एका परिसंवादात्मक स्वरूपात आयोजित केला जाणार आहे. क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सर्व संवर्गातील तीन ते चार महिला प्रतिनिधींना यात निमंत्रित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत महिला शक्तीचा प्रातिनिधिक गौरव म्हणून पुस्तक व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात येईल.

यावेळी उपस्थित महिला प्रतिनिधींना महावितरणमध्ये सेवा देताना आलेले अनुभव कथन करण्याची संधी मिळेल. विशेषतः, खडतर आर्थिक व सामाजिक परिस्थितीतून जिद्दीने पुढे आलेल्या महिला त्यांच्या संघर्षगाथा थोडक्यात सांगू शकतील. तसेच, कला, क्रीडा, अभिनय आणि साहित्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या महिलांच्या कार्याची माहितीही या व्यासपीठावरून दिली जाईल. याशिवाय, महावितरण अंतर्गत काही प्रातिनिधिक प्रश्न किंवा सूचना मांडण्यासाठीही त्यांना वाव मिळेल.

विभाग प्रमुखांचे गौरवपर मनोगत

या कार्यक्रमादरम्यान सर्व संबंधित विभाग प्रमुख महिला कर्मचाऱ्यांच्या कार्याबद्दल गौरवपर मनोगत व्यक्त करतील, ज्यामुळे कंपनीतील महिलांच्या कामाची योग्य दखल घेतल्याचे आणि त्यांच्याप्रति आदर असल्याचे सिद्ध होईल. महावितरणमधील या ‘सौदामिनींचा सन्मान त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवून इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल. या विशेष उपक्रमामुळे कंपनीतील महिलांच्या कार्याला आणि त्यागाला योग्य तो मानसन्मान मिळेल, आणि नव्या जोमाने काम करण्यास प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास अनेक महिला कर्मचा-यांनी व्यक्त केला आहे.

नागपूर परिमंडलात वाढती स्त्रीशक्ती

महावितरण केवळ वीज वितरण कंपनी नसून, ती आपल्या सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून कार्यरत आहे. विशेषतः, महावितरण तांत्रिक कर्मचाऱ्यांमध्ये महिलांना सामावून घेत असून, त्या सर्व प्रकारची तांत्रिक कामे सक्षमतेने पार पाडतात. प्रचलित शासन निर्णयानुसार प्रत्येक भरतीत महिला आरक्षण देणारी महावितरण ही भारतातील पहिली वीज कंपनी आहे. शासनाच्या प्रचलित नियमांनुसार, सरळसेवा भरतीमध्ये महावितरणमध्ये महिलांना 30 टक्के आरक्षण सर्व स्तरांवर देण्यात येते. आजच्या घडीस महावितरणच्या नागपूर परिमंडला अंतर्गत नागपुर जिल्ह्यात तब्बल 263 तर वर्धा जिल्ह्यात 70 अशा एकूण 333 महिला विद्युत सहायक कार्यरत आहेत. याशिवाय निवड झालेल्या 99 महिला विद्युत सहायक लवकरच रुजु होणार आहेत. सोबतच कंपनीच्या प्रत्येक पदांवर महिला कर्मचा-यांची टक्केवारी मोठ्या प्रमाणात आहे. जे महिला सक्षमीकरणाचे एक उत्तम उदाहरण आहे.