पुणे येथे आयोजित २० व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात गडचिरोली पोलीस दलातील श्वान सारा हीने पटकाविले सुवर्णपदक
श्वानपथक स्पर्धेमधील गुन्हे शोधक या प्रकारात श्वान साराची सर्वोत्कृष्ट कामगिरी
महाराष्ट्र राज्यात शहरांचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून, गुन्हेगारीचे स्वरूपही बदलत चाललेले आहे. या बदलत्या परिस्थितीत पोलीस आपले कर्तव्य यशस्वीरित्या पार पडण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत. कंट्रोल रूम असो की पोलीस ठाणे कोणत्या क्षणी कोणती माहिती वा तक्रार पोलीसांकडे येईल, याचा नेम नसतो. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पोलीसांना नेहमीच सज्ज राहावे लागते. पोलीसांनी कौशल्याने तपास कसा करावा; तसेच विविध प्रकारचे ज्ञान मिळावे, त्यांनी अद्ययावत राहावे, यासाठी पुणे येथे दिनांक १५ ते १९ सप्टेंबर २०२५ या कालावधीत २० व्या राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
पोलीसांनी आपले गुणवत्ता कौशल्य, कार्यक्षमता व दर्जा वाढविणे हा या मेळाव्या मागील उद्देश असून, राज्य गुन्हे अन्वेषण विभागातर्फे या मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असते. या स्पर्धेमध्ये एकूण २५ वेगवेगळ्या विभागांनी आपला सहभाग नोंदविला होता. पुणे येथे आयोजीत २० व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये सायंटिफिक एड टु इन्वेस्टीगेशन, पोलीस फोटोग्राफी, पोलीस व्हिडीओग्राफी, कम्प्युटर अवेअरनेस, अॅन्टी सॅबोटेज चेक, श्वान पथक इ. स्पर्धा घेण्यात आल्या. या सर्व स्पर्धेमध्ये लेखी, तोंडी परीक्षेबरोबरच प्रात्यक्षिक परीक्षाही घेण्यात आली असून, वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ञांमार्फत परीक्षण करण्यात आले. पाच दिवस चाललेल्या विविध स्पर्धेमध्ये गडचिरोली पोलीस दलातील श्वान सारा हिने श्वान पथक स्पर्धेमधील गुन्हेशोधक प्रकारात सुवर्ण पदक पटकाविले आहे. तसेच नागपूर येथे होणाऱ्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा श्वान स्पर्धेकरीता महाराष्ट्रातून निवड झाली आहे. याबद्दल पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी श्वान पथक गडचिरोलीचे प्रभारी अधिकारी श्री. ओमप्रकाश बोरेवार, पदक प्राप्त श्वान सारा, श्वान हस्तक पोहवा/२१३४ राजेंद्र कौशिक पोहवा /२३१४ अर्जुन परकीवार यांचे अभिनंदन करत भविष्यात अशीच कामगिरी करण्याबाबत शुभेच्छा दिल्या आहेत.