राज्यात ‘संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा’ मोहीम राबविणार – महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम
मुंबई, दि. १६ : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या पुढाकाराने इयत्ता ८ वी ते १२ वी आणि पदवी स्तरावर संविधानाविषयी जनजागृती करण्यासाठी ‘ संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा २०२५’ स्पर्धा राबविण्यात येणार आहे. या मोहिमेतून संविधानाबाबत प्रभावीरीत्या जनजागृती करावी, अशा सूचना महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी संविधान प्रश्नमंजुषा जनजागृती मोहिमेबाबत आयोजित बैठकीत दिल्या.
या प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी इयत्ता ८ वी ते पुढील इयत्तांमधील विद्यार्थ्यांमध्ये सर्व शाळांमधून जनजागृती करण्याचे आवाहन करत उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम म्हणाले, शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, युवा करिअर संस्था आणि आयोगाच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा यशस्वीरित्या राबविण्यात यावी. स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांमधून जिल्हास्तरावर, त्यानंतर विभाग आणि राज्य स्तरावर निवड करावी. शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची आकडेवारी उपलब्ध करून द्यावी. या स्पर्धेसाठी संबंधित विभागांनी आर्थिक तरतूद करावी.
बैठकीला आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या सहसंचालक चंचल पाटील, शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव श्री. कुलकर्णी, बार्टीचे प्रकल्प व्यवस्थापक सुमेध थोरात, युवा करिअर संस्थेचे मुनाल थूल, आदिवासी विकास विभागाचे कक्ष अधिकारी सुरज मुनेश्वर आदी उपस्थित होते.