जिल्हाधिकाऱ्यांनी केली माविमच्या कामाची पाहणी·

जिल्हाधिकाऱ्यांनी केली माविमच्या कामाची पाहणी·

परसोडी व शिवनीबांधला भेट·

दूध संकलन केंद्राची व बारदाना निर्मितीची पाहणी

भंडारा, दि. 16 : महिला आर्थिक विकास महामंडळच्या कामांची पाहणी करण्यासाठी काल जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी साकोली तालुक्यातील परसोडी दुध संकलन केंद्र व शिवनीबांध बारदाना निर्मिती केंद्राचा पाहणी दौरा केला.

 

परसोडी येथील गंगोत्री दूध संकलन केंद्राला भेट दिली. जिल्ह्यात बचत गटांना नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्योग विकास प्रकल्प अंतर्गत 44 दुध संकलन केंद्र सुरू करण्यात आले. बचत गटातील महिलांची उद्योग उभारणीसाठी व त्यांच्या आर्थिक विकासासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. सन 2022-23 या वर्षात 36 दूध संकलन केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे दूध संकलन केंद्रांचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातील बचत गटातील महिला शेती या व्यवसायासोबत पशु व्यवसायसुद्धा करतात. त्यामुळे दुधाचे प्रमाण वाढविण्यासाठी महिलांना विविध योजनांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीकडे त्यांचा कल वाढविण्यात येत आहे. भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी दुध संकलन केंद्रातील महिलांना मार्गदर्शन केले व दुध संकलन प्रक्रिया जाणून घेतली. महिलांनी चांगली सुरूवात केली असून त्यांनी गावातील इतर महिलांना सुद्धा प्रोत्साहित करावे, असे यावेळी श्री. कुंभेजकर म्हणाले.

 

साकोली तालुक्यातील शिवनीबांध येथे बारदाना उद्योग केंद्राचीसुद्धा पाहणी करण्यात आली. या केंद्राच्या माध्यमातून धान उत्पादकांना बारदाना उपलब्ध करून दिल्या जातो. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जाते त्यामुळे बारदाण्याची आवश्यकता भासते. बचत गटातील महिला बारदाना निर्मिती करून शेतकऱ्यांना बारदाना उपलब्ध करून देतात. यातूनच बचत गटातील महिलांना रोजगार मिळतो. तेजश्री फायनान्स योजनेअंतर्गत गरीब महिलांना उद्योग उभारणीसाठी दहा हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येते. यातूनच त्यांना त्यांचे लघुउद्योग मोठे करण्यासाठी सहकार्य केले जात असल्याची माहिती माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे यांनी यावेळी दिली. जिल्ह्यात बारदान्याचे एकूण 6 केंद्र सुरू असून एका युनिटमध्ये 32 महिला काम करतात. या प्रसंगी माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे यांनी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांना माविमच्या कामा विषयी विस्तृत माहिती दिली.