खुनाच्या गुन्ह्यात सक्रीय सहभागी असलेल्या एका जहाल माओवाद्यास गडचिरोली पोलीस दलाने केली अटक

खुनाच्या गुन्ह्यात सक्रीय सहभागी असलेल्या एका जहाल माओवाद्यास गडचिरोली पोलीस दलाने केली अटक

अटक माओवाद्याचा माहे नोव्हेंबर २०२३ मध्ये मौजा कापेवंचा येथे झालेल्या रामजी चिन्ना आत्राम यांच्या हत्येमध्ये होता सक्रिय सहभाग

सन २०२४ मध्ये पेरमिली दलम संपूष्टात येण्यापूर्वी पेरमिली दलममध्ये राहून करत होता सदस्य पदावर काम

गडचिरोली डिव्हीजनमध्ये सहा वर्षांपासून सक्रीय असलेल्या माओवाद्यास गडचिरोली पोलीस दलाने अत्यंत शिताफिने हैद्राबाद (तेलंगना) येथुन केली अटक

महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते एकुण ०२ लाख रुपयांचे बक्षीस

गडचिरोली जिल्हा हा माओवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. येथे माओवादी हे सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. माओवाद्यांच्या सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक कार्यवाह्यांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या माओवाद्यांस दिनांक ०४/०९/२०२५ रोजी गडचिरोली पोलीस दलाने अटक केली आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे माहे जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकुण १०८ माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे.

सविस्तर वृत्त असे आहे की, पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस दलातील सपोनि. प्रशांत बोरसे व सी-६० पथक यांच्या नेतृत्वात जवानांनी गोपनियरित्या अभियान राबवून जहाल माओवादी नामे शंकर ऊर्फ अरुण येर्रा मिच्चा, वय २५ वर्षे, रा. बांदेपारा, ता. भोपालपट्टनम, जि. बीजापूर (छ.ग.) यास हैद्राबाद येथून दिनांक ०४/०९/२०२५ रोजी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची अधिक सखोल चौकशी केली असता, माहे नोव्हेंबर २०२३ मध्ये मौजा कापेवंचा येथे झालेल्या रामजी चिन्ना आत्राम या निरपराध इसमाच्या हत्येमध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला पोस्टे अहेरी येथे त्या अनुषंगाने दाखल अप क्र. ०४११/२०२३ कलम ३०२, १४७, १४८, १४९, १२० (ब) भादवि सह कलम ३, २७भाहका अन्वये गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनूसार जहाल माओवादी नामे शंकर ऊर्फ अरुण येर्रा मिच्चा हा सप्टेंबर २०१८ मध्ये छत्तीसगड येथील नॅशनल पार्क एरीयामधील मद्देड दलममध्ये भरती झाला होता व त्याने गडचिरोली येथील पेरमिली दलममध्ये सदस्य पदावर काम केले. मर्दिनटोला, पैडी इ. सारख्या चकमकींमध्ये अनेक माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश प्राप्त झाले होते. गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात आलेल्या तीव्र अभियानामुळे त्याच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाल्यामूळे पेरमिली दलम संपूष्टात येण्यापूर्वी तो सन २०२४ मध्ये दलम सोडून घरी परत आला होता. घरी ७ ते ८ महिणे शेतीची कामे केल्यानंतर आंध्रप्रदेश येथील एंटापूर व त्यानंतर हैद्राबाद येथे राहून काम करुन आपला उदनिर्वाह करीत होता. शंकर ऊर्फ अरुण येर्रा मिच्चा हा सध्या हैद्राबाद येथे वास्तव्यास असल्याच्या मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन गडचिरोली पोलीस दलाने खून, चकमक अशा देशविघातक कृत्य करणाऱ्या या जहाल माओवाद्यावर गोपनियरित्या पाळत ठेवून दिनांक ०४/०९/२०२५ रोजी हैद्राबाद येथुन त्याला अटक केली आहे. सदर माओवाद्यास मा. न्यायालयासमक्ष हजर केले असता, मा. न्यायालयाने त्यास चार दिवसांचा पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केला आहे.