स्वातंत्र्यदिनी ‘सौरोत्सवा’चा जागर: नागपूर आणि वर्ध्यात ‘महावितरण’कडून सौर योजनांची माहिती

स्वातंत्र्यदिनी ‘सौरोत्सवा’चा जागर: नागपूर आणि वर्ध्यात ‘महावितरण’कडून सौर योजनांची माहिती

नागपूर, दि. 14 ऑगस्ट: उद्या, 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या शुभमुहूर्तावर नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागात सौरोत्सवाचा एक नवा अध्याय सुरू होत आहे. ‘महावितरण’ने ग्रामीण वीज ग्राहकांसाठी ‘सौर ग्राम दिन’ हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत, ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना’, ‘प्रधानमंत्री कुसुम योजना’ आणि ‘मागेल त्याला सौर कृषीपंप योजना’ यांसारख्या क्रांतिकारी सौर योजनांची सखोल माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविल्या जाणार आहेत.

या अभियानांतर्गत, ‘महावितरण’चे वरिष्ठ अधिकारी आणि अभियंते विविध ग्रामपंचायतींमध्ये आयोजित केलेल्या ग्रामसभांमध्ये उपस्थित राहून थेट ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत. शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनांचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा आणि ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर व्हावे, याकरिता या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

सौर ऊर्जेच्या क्रांतीमध्ये नागपूर आणि वर्धा आघाडीवर

राज्यात सौर ऊर्जेच्या वाढीसाठी ‘महावितरण’ने मोठे पाऊल उचलले आहे. ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजने’च्या माध्यमातून 1,000 मेगावॅट वीज निर्मितीचा टप्पा नुकताच पार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या यशस्वी वाटचालीत नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. या भागांतील प्रखर सूर्यप्रकाशाचा फायदा घेऊन अधिक वीज ग्राहकांनी सौर ऊर्जेच्या निर्मितीमध्ये सहभागी व्हावे, यासाठी हा जागर आयोजित करण्यात आला आहे.

या उपक्रमादरम्यान, ‘महावितरण’चे अधिकारी केवळ माहितीच देणार नाहीत, तर या योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक असलेले अर्ज आणि कागदपत्रेही ग्रामसभांच्या ठिकाणी स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे, इच्छुक ग्राहकांना लगेचच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

‘महावितरण’च्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या नेतृत्वाखालील अधीक्षण अभियंता, कार्यकारी अभियंता, उपविभागीय अधिकारी, शाखा अभियंता आणि इतर कर्मचारी त्यांच्या कार्यक्षेत्रातील ग्रामसभांमध्ये सहभागी होणार आहेत.

हा जागर केवळ एक माहितीपर उपक्रम नसून, ग्रामीण भागाच्या विकासाला आणि आत्मनिर्भरतेला चालना देणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या माध्यमातून ‘महावितरण’ सौर ऊर्जेच्या माध्यमातून एक उज्वल आणि आत्मनिर्भर भविष्य घडवण्यासाठीच्या प्रयत्नांचा एक भाग ठरणार आहे.