विजेसंबंधी संपुर्ण माहिती केवळ एका क्लिक्वर
नागपूर, दि. 29 जुलै 2025: वीजपुरवठ्यासंबंधी माहितीसाठी महावितरण कार्यालयात हेलपाटे मारणे किंवा फोन करण्याची आता आवश्यकता नाही! महावितरणने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तुमच्यासाठी सोप्या आणि जलद सुविधा उपलब्ध केल्या आहेत. ‘महावितरण मोबाईल ॲप’ आणि ‘ऊर्जा’ चॅटबॉटच्या मदतीने तुम्ही आता घरबसल्या तुमच्या विजेच्या सर्व समस्या आणि प्रश्नांची उत्तरे मिळवू शकता, तसेच तक्रारीही नोंदवू शकता. पण यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे, तो म्हणजे तुमचा मोबाईल नंबर महावितरणकडे नोंदणीकृत असणे.
पावसाळ्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित होणे, खांब पडणे किंवा तारा तुटणे अशा समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवतात. अशा वेळी नेमकी काय समस्या आहे आणि ती कुठे आहे, याची माहिती ग्राहकांना पटकन मिळत नाही. याच गोष्टी लक्षात घेऊन महावितरणने हे नवीन उपक्रम सुरू केले आहेत. या ॲप आणि चॅटबॉटमुळे तुम्हाला विजेच्या बिलाची माहिती, बिल भरणा, तक्रारी नोंदवणे आणि नवीन वीजजोडणीची माहिती एका क्लिकवर मिळेल. यासाठी महावितरणने ग्राहकांना अनेक पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत.
महावितरण मोबाईल ॲप: हे ॲप गुगल प्ले स्टोअर्स आणि ॲपल ॲप स्टोअर्सवर उपलब्ध आहे. यावर तुम्हाला आवश्यक माहिती, तक्रार नोंदणी आणि इतर अनेक सुविधा मिळतील.
‘ऊर्जा‘ चॅटबॉट: हा चॅटबॉट 24×7 उपलब्ध असून, तो तुम्हाला नवीन वीजजोडणी अर्जाची सद्यस्थिती, वीजबिल भरणे, वीजबिलाचा तपशील, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल नोंदणी, स्वतः मीटर रीडिंग सबमिट करणे, गो-ग्रीन नोंदणी, वीज वापर आणि बिलाचे कॅल्क्युलेटर अशा अनेक गोष्टींमध्ये थेट मदत करेल.
महावितरण संकेतस्थळ (www.mahadiscom.in): या संकेतस्थळावर तुम्हाला सर्व माहिती सविस्तरपणे उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्यामुळे ग्राहकांच्या तक्रारींचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
महावितरण कॉल सेंटर: वीजपुरवठा, वीज देयक आणि इतर तक्रारींसाठी महावितरणचे 24×7 कॉल सेंटर सदैव सेवेत आहे. तुम्ही 1912/19120/ 1800-212-3435 किंवा 1800-233-3435 या क्रमांकांवर कॉल करून तक्रार नोंदवू शकता.
मोबाईल क्रमांक नोंदणी: ग्राहकाला महावितरणकडे त्याचा मोबाईल क्रमांकाची नोंदणी करणे किंवा तो बदलणे खूप सोपे आहे यासाठी ‘MPEG <12 अंकी ग्राहक क्रमांक>’ असा एसएमएस 9930399303 या क्रमांकावर एसएमएस पाठवा. अथवा महावितरणच्या संकेतस्थळावरून किंवा मोबाईल ॲपवरूनही तुम्ही मोबाईल क्रमांक नोंदवू किंवा बदलू शकता.
मोबाईल क्रमांक नोंदणीचे फायदे: एकदा महावितरणकडे ग्राहकाचा मोबाईल क्रमांक नोंदणीकृत झाला की, ग्राहकाला वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार देण्यासाठी, नोंदणीकृत मोबाईलवरून 022-50897100 या क्रमांकावर मिस कॉल करू शकता किंवा ‘NOPOWER <12 अंकी ग्राहक क्रमांक>’ असा एसएमएस 9930399303 या क्रमांकावर पाठवू शकता. वेळेवर विजेसंबंधी अपडेट्स मिळतील. याशिवाय ग्राहकाचा वेळ वाचेल आणि अनावश्यक त्रासातून सुटका मिळेल.
मोबाईल नंबर अपडेट करा: काही ग्राहकांचे चुकीचे क्रमांक नोंदवले असू शकतात. अशा ग्राहकांनी आपला अचूक मोबाईल क्रमांक नोंदवावा. तसेच, ज्या ग्राहकांना आधी नोंदवलेला मोबाईल क्रमांक बदलायचा असेल, त्यांनीही नवीन क्रमांक नोंदणीकृत करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
महावितरणने या सर्व सुविधा ग्राहकांना एका क्लिकवर मिळाव्यात, त्यांचा वेळ वाचावा, त्यांना विजेच्या संदर्भात वेळोवेळी अपडेट्स मिळावेत आणि तक्रारींचे प्रमाण कमी व्हावे यासाठी सुरू केल्या आहेत. अधिकाधिक ग्राहकांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरण करत आहे.