बनावट तोतया पत्रकारापासुन सावधान
राज्य मार्गावरील ट्रक चालकांकडे खंडणी मागणारे व शासकीय अधिकाऱ्यांना धमकाविणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल
दिनांक १६ जुलै, २०२५ रोजी फिर्यादी योगीता अभिजीत राणे, मोटार वाहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन विभाग, चंद्रपूर यांनी पोलीस स्टेशन विरुर येथे तक्रार नोंदविली की, दिनांक १६/०७/२०२५ चे १५:३० ते १६:३० वाजता दरम्यान मौजा लक्कडकोट तपासणी नाका येथे कर्तव्यावर हजर असतांना त्यांना वॉकीटॉकीवर माहिती मिळाली की, एक ग्रे कलरची अर्टिका वाहन क्र. MH34-BR-1878 मधील इसम हे ट्रक वाल्याकडुन पैसे घेतात अशी माहिती मिळाल्याने फिर्यादीने त्यांना विचारणा केली असता सदर इसम यांनी “आम्ही पत्रकार आहोत, कुठेही फिरु शकतो, काहीही करु शकतो, तुम्ही विचारणारे कोण” असे म्हटले असता फिर्यादीने त्यांना ओळखपत्र दाखवा अशी विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर देवुन फिर्यादीस अश्लिल शब्दात शिवीगाळ करुन त्यांच्या शासकीय कामात अडथळा आणुन “तुम्ही नौकरी कशी करता, हे पाहतो” अशी धमकी दिली. अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरून सदर इसम नामे (१) मयुर राईकवार (२) सन्नी धुन्ना दोन्ही रा. चंद्रपूर यांचेविरुध्द पोलीस स्टेशन विरुर येथे अपराध क्रमांक १०२/२०२५ कलम २२१, २९६, ३५१ (२), ७९ भारतीय न्याय संहिता-२०२३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचे प्राथमिक तपासात, सदर गुन्हयातील आरोपी क्रमांक (१) मयुर अनिल राईकवार आणि आरोपी क्रमांक (२) अर्जुन उर्फ सन्नी हरविंद्रसिंह धुन्ना दोन्ही रा. चंद्रपूर असे असल्याचे निष्पन्न झाले असुन गुन्हयाचा पुढील तपास विरुर पोलीस करीत आहे.
तरी, सर्व नागरीक, शासकीय व खाजगी अधिकारी आणि ट्रक चालक व मालकांना आवाहन करण्यात येते की, बनावट पत्रकारांच्या धमकी ला बळी पळुन त्यांना खंडणी देवू नये. याबाबत त्वरीत नजीकच्या पोलीस स्टेशन ला किंवा पोलीस नियंत्रण कक्षाचे ११२ वर कॉल करुन माहिती देवुन पोलीसांना सहकार्य करावे.