आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलामार्फत सामुहिक योग शिबिराचे आयोजन
सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये, पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथे देखील पार पडले योग शिबिर
पोलीस मुख्यालय गडचिरोली, पोलीस उप-मुख्यालय प्राणहिता सह जिल्हा भरातील जवळपास 3000 अधिकारी व अंमलदार यांनी घेतला योग शिबिरात सहभाग
दिनांक २१ जून हा दिवस संपूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यामध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्व आहे. आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगासनाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तंदरुस्त ठेवण्याकरिता, आपले शरीर आणि मन सशक्त करता येण्याकरिता आज रोजी २१/०६/२०२५ रोजी ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने गडचिरोली पोलीस मुख्यालय येथे सकाळी ०६:३० वाजता योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. यासोबतच पोलीस उप-मुख्यालय, प्राणहिता आणि सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोस्टे/उपपोस्टे पोमकें येथे सामुहिक योग शिबिराचे आयोजन करण्यात आले.
पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथील योग शिबिरामध्ये पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस मुख्यालय, विशेष अभियान पथक व राज्य राखीव पोलीस दल येथील १००० हून अधिक पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. तसेच पोलीस उप-मुख्यालय, प्राणहिता येथील योग शिबिरामध्ये जवळपास ५०० पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. या योग शिबिरामध्ये योगाचे विविध प्रकार शिकविण्यात आले. तसेच पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथील योग शिबिरादरम्यान योगा प्रशिक्षक श्री. संतोष भाऊराव वेखंडे यांनी उपस्थित सर्व पोलीस अधिकारी/अंमलदार यांना योगासनाचे महत्व पटवून सांगीतले. यासोबतच योग कसा करावा, कोणती योगासने शरीराला आणि मनाला सशक्त व सक्षम ठेवू शकतात याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आपले सर्वांगिण आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आणि सकारात्मकता निर्माण होण्यासाठी योगा हे चांगले साधन आहे. तसेच आपल्या जीवन शैलीमध्ये व्यायामाला स्थान देऊन रोज कमीत कमी २० मिनीटे सर्वांनी योगासाठी वेळ देण्याचे पोलीस अधीक्षक यांनी आवाहन केले आहे.
सदर योग शिबिरामध्ये पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. सत्य साई कार्तिक, पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे, उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली श्री. सुरज जगताप तसेच योगा प्रशिक्षक श्री. संतोष वेखंडे हे उपस्थित होते.
सदर शिबिराच्या यशस्वीतेसाठी गडचिरोली पोलीस मुख्यालयाचे रापोनि. श्री. अनुजकुमार मडामे, पोलीस कल्याण शाखेचे प्रभारी अधिकारी श्री. नरेंद्र पिवाल व इतर शाखा/पोस्टे/उपपोस्टे/पोमकेंचे प्रभारी अधिकारी/अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.