जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत चुकीचा अहवाल जोडल्याने न्यायालयातून दाद मागणार – प्रकाश बनसोड
सिंदेवाही – तब्बल १३ वर्षांनंतर चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लागली असून त्यासाठी उमेदवारी अर्ज घेण्यात आले. उमेदवारी अर्जासोबत प्रतिनिधित्व करीत असलेल्या संस्थेचा लगतच्या वर्षाचा ऑडिट वर्गाचा अहवाल जोडणे गरजेचे असताना काही उमेदवारांनी चुकीचा ऑडिट अहवाल जोडला असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज स्वीकारला. व तो उमेदवारी अर्ज पात्र केला असल्याने संस्थेचे संचालक प्रकाश पाटील बनसोड हे लवकरच न्यायालयातून दाद मागणार असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ही दर पाच वर्षांनी होते. मात्र काही कारणास्तव ही निवडणूक तब्बल १३ वर्ष स्थगित ठेवून सन २०२५-२६ ते २०३०-३१ या पाच वर्षाच्या कालावधी साठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला.निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून ५ जून ते ११ जून पर्यंत अर्ज घेण्यात आले. १२ जून रोजी अर्जाची छाननी करण्यात आली. आणि १३ जून रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली. उमेदवारी अर्जासोबत उमेदवार ज्या संस्थेचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्या संस्थेचे ऑडिट वर्ग अ, ब, असलेला अहवाल हा लगतच्या वर्षाचा जोडण्याचे अर्जामध्ये नमूद केले आहे. निवडणूक लागलेल्या वर्षाच्या कालावधी नुसार लगतचा वर्ष २०२४- २५ या वर्षाचा ऑडिट अहवाल जोडणे गरजेचे आहे. परंतु काही उमेदवारांनी ऑडिट अहवाल हा २०२३-२४ चा जोडून निवडणूक निर्णय अधिकारी यांचेवर दबाव आणून आपला उमेदवारी अर्ज पात्र करण्यास भाग पाडले आहे. ज्या ज्या उमेदवारांनी सन २०२३- २४ या वर्षाचा ऑडिट अहवाल उमेदवारी अर्जाला जोडला आहे. त्या सर्व उमेदवारांचे अर्ज बाद करून त्यांना अपात्र करणे गरजेचे आहे. परंतु तशा सर्व उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पात्र केले आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रकाश पाटील बनसोड हे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे विरोधात न्यायालयात जाऊन याचिका दाखल करणार असल्याचे बनसोड यांनी माध्यमांना कळविले आहे.