‘ये पुढे मतदान कर’ च्या लयीत थिरकली पावले

ये पुढे मतदान कर’ च्या लयीत थिरकली पावले

फ्लॅश मॅाबने अफाट गर्दीचे वेधले लक्षवज

 भंडारा जिल्हानिवडणूक विभाग व स्वीप टीमचा लक्षवेधी उपक्रम

                 भंडारा,17 : फ्लॅश मॅाब .एक विलक्षण प्रयोग.लखलखाट..क्षणिक चमक..वेगाने येणे व क्षणात नाहिसे होणे. हा शब्द पाश्चात्यी असला तरी पथनाट्याचा जरासा स्पर्श असलेला नृत्यनाट्याचा हा सुंदर असा प्रयोग..कुठूनसे कोणी तरी गर्दीतून झपाटल्यासारखे येते.अचानक झिंगाट होऊन  नाचायला लागते…गर्दीतला प्रत्येक जण थबकतो..वळून वळून पहायला लागतो..शब्दांवरुन उद्देश लक्षात येतो मॅाब  पण ताल धरायला लागतो, सहभागी होतो..स्तब्ध होऊन पहायला लागतो,

            गाडीच्या हॅंडलवरचे हात ताल धरायला लागतात हळूहळू एका लयीत सारे थिरकायला लागतात..एक दोन..तीन …चार…फक्त चारच मिनिटात…गाण्याचे सूर हवेत विरत जातात..काय होतेय कळायच्या आतच सारे संपते..क्षणात चमकून जाणारा मॅाब  ही पसार होतो.जगरहाटी पूर्ववत होते..मनात अनेक सुरावटी व तरल लहरी घेऊन लोक,गाड्या  पुन्हा धावायला लागतात..अरेच्चा हे स्वप्नं होते की सत्य????? हाच तो फ्लॅश मॅाब .एक भन्नाट साक्षात्कारी  अनुभव. लखलखाटी नृत्यनाट्य.एका विशिष्ट उद्देशाने भंडारा स्वीप टीमने आज भंडारा जिल्ह्यातील मोहाडी,तुमसर येथील तीन  व शहरातल्या चार चौकात या विलक्षण प्रयोगाचे सादरीकरण केले.मतदार जागृतीच पण जरा हटके..ये पुढे मतदान कर,लोकशाहीचा सन्मान कर

या शासनाने प्रसारित केलेल्या गीतावरचा हा प्रयोग.

           जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयांतर्गत भंडारा स्वीप टीम कडून मोहाडी,तुमसर,व भंडारा शहर अशा सात ठिकाणी फ्लॅश मॅाब चे प्रयोग घेण्यात आले. लाल बहादूर शास्त्री विद्यालय व जिजामाता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी साकारलेला स्वीप टीम भंडारा चा मतदार जागृतीचा  विशेष प्रयोग..भंडारा जिल्ह्यासाठीच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रासाठी चा एक लक्षवेधी उपक्रम ठरला आहे.

             जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या निर्देशात जिल्हा  निवडणूक विभागाचे  उप निवडणूक अधिकारी   प्रशांत पिसाळ व  जिल्हा नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी माध्यमिक रवींद्र सलामे   यांच्या मार्गदर्शनात साकारलेला हा प्रयोग स्मिता गालफाडे यांनी दिग्दर्शित केलेला होता.

          या प्रयोग सादर करताना तुमसर उपविभागीय अधिकारी  दर्शन निकाळजे,भंडारा उपविभागीय अधिकारी गजेंद्र बालपांडे तहसीलदार मोहाडी सुरेश वागचोरे, मोहाडी नगरपंचायत प्रशासन अधिकारी  शिवनंदन बर्डे, तुमसर तहसीलदार मोहन टिकले, नायब तहसीलदार भुमेश्वर पेंदाम, संजय जांभुळकर, नगरपरिषद मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम, प्रशासन अधिकारी देवानंदजी सावके,अंजली बारसागडे उपमुख्य अधिकारी  सुनीलकुमार साळुंके, गटशिक्षणाधिकारी  अर्चना माटे, विस्तार अधिकारी टेकलाल पुस्तोडे, तालुका सहायक नोडल सचिन ढबाले, तुमसर आगारप्रमुख  सारिका निमजे, सहायक आगार प्रमुख  अर्चना मसरके, या प्रयोग सादर करताना तुमसर बसस्टॅाप  आगार व्यवस्थापक सारिका पुष्पम लिमजे,बसस्टॅंड प्रमुख रचना मस्करे वाहतूक निरीक्षक सागर मलघटे स्वीप कार्यक्रम जिल्हा भंडारा सहायक नोडल अधिकारी स्मिता गालफाडे, सुनील सावरकर, विनोद किंदले॔ ,अरुण मरगडे श्रीकांत वैरागडे, भूषण फसाटे, प्रदीप झुरमुरे ,संजोग कांबळे, जुबेर कुरेशी, शरद गिरी हे उपस्थित होते.

मतदार जागृती साठी सर्वांच्या लक्षात राहिल अशा प्रयोगाचे सादरीकरणाची चर्चा गावागावात पोहचली.उपस्थितांनी हा क्षण लगेच मोबाईल मध्ये टिपला.

फ्लॅश मॅाब चे विडिओ जिल्हाभरात सर्वदूर पोहचले.