भंडारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ‘ग्राम चलो अभियानाची’ दिशा…

भंडारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ‘ग्राम चलो अभियानाची’ दिशा

निश्चित -माननीय कुलगुरूंची जिल्हाधिकारी व अधिकाऱ्यांसोबत चर्चा

        भंडारा,दि.12: भंडारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरिता ‘ग्राम चलो अभियानाची’ दिशा निश्चित करण्यात आली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी भंडारा जिल्ह्याचा सामाजिक व आर्थिक विकास व्हावा म्हणून जिल्हाधिकारी श्री. योगेश कुंभेजकर व जिल्हा प्रशासनातील अन्य अधिकाऱ्यांसोबत सोमवार, दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या बैठकीत चर्चा केली.

        राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून शताब्दी  महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने ‘रिचिंग टू अनरीच्ड’ अभियान राबविले जात आहे.  या अभियान अंतर्गत स्थानिक नैसर्गिक संसाधनांचा वापर करून रोजगाराची साधने उपलब्ध करून देत ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

         भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, जिल्हाधिकारी श्री. योगेश कुंभेजकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत कडू, पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने, विद्यापीठ जीवन शिक्षण आणि विस्तार विभाग सदस्य डॉ. कल्पना पांडे, मत्स्य विज्ञान विद्यालय, नागपूरचे सहा. प्राध्यापक, डॉ. सचिन बेलसरे, रेशिम विभाग मार्गदर्शक डॉ. सुरेश रैना, जिल्हा नियोजन अधिकारी शशीकुमार बोरकर,विद्यापीठ रेशीम विभागातील श्री. प्रताप शुक्ला आदी उपस्थित होते.

         भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द पुनर्वसन क्षेत्रातील ३४ गावांचे सर्वेक्षण करून तेथील नागरिकांचे जीवनमान सुधारण्याबाबत विविध उपक्रम राबविण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये रेशीम विभागातील अधिकारी श्री. रैना व विद्यापीठाचे रेशीम विभागातील प्रतिनिधी यांनी मलबेरी व टसर सिल्क उत्पादन वाढविण्याबाबत माहिती दिली.

      त्या अनुषंगाने भंडारा जिल्ह्यातील रेशीम विभाग काम करणार आहे. जिल्ह्यामध्ये उपलब्ध पशुधनाच्या माध्यमातून दुधाचे उत्पादन वाढविण्याकरिता महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ ग्रामीण भागात प्रसार प्रचार करणार आहे. सोबतच दोन्ही विद्यापीठाकडून पुनर्वसन झालेल्या भागातील सुशिक्षित युवकांसाठी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना (PMEGP) व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना (CMEGP) अंतर्गत मत्स्य पालनातून उद्योग निर्मितीची शक्यता तपासत उद्योग उभा करण्यास मदत केली जाणार आहे.

       जिल्ह्यातील विविध उत्पादनांचे व योजनांचे डिजिटल मार्केटिंग करण्याबाबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ जिल्हा प्रशासनामार्फत मदत करणार आहे. राष्ट्रीय कौशल्य परिषदेने निश्चित केलेल्या निकषाच्या आधारे आत्मा व कृषी विभागासोबत मिळून कौशल्य विकास कार्यक्रम राबविणार आहे. या महत्त्वपूर्ण विषयांवर बैठकीत जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. योगेश कुंभेजकर यांनी समन्वय साधून पथदर्शी कृती आराखडा पुढच्या सभेत ठेवण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.