हत्तीरोग दूरीकरण औषधोपचार (MDA-IDA) मोहीमेचे आयोजन

हत्तीरोग दूरीकरण औषधोपचार (MDA-IDA) मोहीमेचे आयोजन

गडचिरोली, दि.21: राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत हत्तीरोग दूरीकरण औषधोपचार मोहीम दिनांक २६ मार्च ते ०५ एप्रिल २०२४ या कालावधीत राबविण्याबाबत आरोग्य विभाग यांचे मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेले आहेत. त्या अनुषंगाने गडचिरोली जिल्यातील चामोर्शी व आरमोरी या दोन तालुक्यात सदर मोहीम राबविण्यात येणार आहे.
हत्तीरोग हा कुलेक्स डासापासून होणारा संक्रमक आजार आहे. कुलेक्स डासाची उत्पत्ती ही घाण पाण्यात, गटारे, सांडपाणी यात मोठ्या प्रमाणात होते. कुलेक्स दुषित डास मनुष्याला चावल्याने हत्तीरोगाचे जंतू मानवी शरीरात प्रवेश करतात व लासिकाग्रंथी मध्ये स्थिरावतात. या आजाराची लक्षणे दिसण्याचा कालावधी हा ८ ते १६ महिन्याचा असतो. या कालावधीत रक्ताची तपासणी केली नाही व औषधउपचार घेतला नाही तर शरीरात हत्तीरोग जंतूची वाढ होऊन हाता-पायावर सूज येणे तसेच अंडकोषावर सूज येणे यासारखी लक्षणे दिसून येतात. या आजाराचे निदान करण्याकरिता रात्री ८ ते १२ च्या दरम्यान रक्तनमुना घेऊन तपासणी केल्यानंतर हातीरोग आजाराचे निदान करता येते.
हत्तीरोग आजार हा गडचिरोली जिल्ह्यातील गंभीर अशी आरोग्याची समस्या आहे या आजारामुळे शारीरिक विकृती, अपंगत्व असे शारीरिक व मानसिक दुष्परिणाम दिसून येतात. यावर उपचार केले नाही तर संबंधित व्यक्तीचे आयुष्य निरर्थक बनते करिता शासनाने हत्तीरोग दूरीकरण औषधोपचार मोहिमेंतर्गत डी.ई.सी. व अल्बेंडाझोल गोळ्यासोबातच आयवरमेक्टीन (Ivermectin) या तीन औषधांची उंची व वयोगटानुसार उपचार घेऊन हत्तीरोग आजाराचा समूळ नाश करता येतो. याकरता गडचिरोली जिल्यातील चामोर्शी तालुक्यातील १७४२२१ लोकसंखेला व आरमोरी तालुक्यातील १००६६८ लोकसंखेला असे दोन तालुक्यात हत्तीरोग दूरीकरण औषधोपचार (MDA-IDA)मोहीम कालावधीत गृहभेटी दरम्यान घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचार्यांच्या समक्ष २ वर्षापेक्षा कमी वयाची बालके व गरोदर माता तसेच गंभीर रुग्ण वगळून सर्वाना हत्तीरोग विरोधी गोळ्या खाऊ घालण्यात येणार आहे.
हि मोहीम प्रभावीपणे राबविण्याकरिता तसेच मोहिमेत लोकसहभाग वाढविण्याकरीता आरोग्य विभाग गडचिरोली यांनी चामोर्शी व आरमोरी तालुक्यातील संपूर्ण जनतेला आवाहन केले आहे.