लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्ष, बँकर्स व प्रिटींग प्रेसला सूचना

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने
राजकीय पक्ष, बँकर्स व प्रिटींग प्रेसला सूचना

गडचिरोली, दि.18: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे अनुषंगाने गडचिरोली लोकसभा क्षेत्र अंतर्गत राजकीय पक्षाची बैठक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांचे अध्यक्षतेखाली आज आयोजित करण्यात आली. यावेळी सहायक जिल्हाधिकारी ओमकार पवार, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, मुख्य लेखा वित्त अधिकारी हेमंत ठाकूर तसेच राजकीय पक्षाचे प्रतिनिधी सर्वश्री दत्तात्रय खरवडे, सुनिल चडगुलवार, अनुप कोहळे, वासुदेव शेडमागे व इतर प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी निवडणूक आचारसंहितेबाबत माहिती दिली. वाहनाचा वापर, प्रचार सभा, लावूडस्पिकर, राजकीय जाहिराती व अनुषंगीक बाबींना राजकीय पक्षाने घ्यावयाच्या पूर्व परवानग्या तसेच निवडणूक खर्चाच्या नोंदी, काय करावे व काय करू नये याबाबत त्यांनी राजकीय पक्षाच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांना नियमांची माहिती दिली.
बँकर्सनी संदिग्ध व्यवहाराची माहिती कळवावी
निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना बँकेचे नवीन खाते त्यांचा अर्ज प्राप्त झाल्यावर आवश्यक कार्यवाही पूर्ण करून त्याच दिवशी तात्काळ सुरू करून द्यावे. तसेच बँकेत जमा व खर्चाच्या संदिग्ध व्यवहाराबाबत विशेषत: १० लाखावरील रकमेच्या व्यवहाराबाबत निवडणूक विभागाला तत्काळ अवगत करावे. बँकेची रकम वहन करणाऱ्या वाहनावर विहित क्युआर कोड लावावा तसेच जीपीएस यंत्रणा सुरू ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी बँकर्सच्या सभेत दिल्या.
प्रिटींग प्रेसला सूचना
राजकीय उमेदवारांचे प्रचार साहित्य छापतांना प्रिटींग प्रेस मालकांनी निवडणूक विभागाकडून पूर्व परवानगी घ्यावी. छापील साहित्यावर प्रकाशक व मुद्रकाचे नाव असावे तसेच उमेदवारांकडून छपाईसाठी प्राप्त होणाऱ्या अर्जाची प्रत, प्रकाशीत प्रतीची संख्या याबाबत निवडणूक खर्च समितीस वेळोवेळी माहिती देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी संजय दैने यांनी प्रिंटींग प्रेसच्या प्रतिनिधींना दिल्या.

Previous articleईव्हीएमची सरमिसळ प्रक्रिया पूर्ण
Next articleआजपासून स्वीकारले जाणार उमेदवारी अर्ज लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जारी