निवडणूक कामासाठी तत्पर राहा जिल्हाधिकाऱ्यांचे विभाग प्रमुखांना निर्देश

निवडणूक कामासाठी तत्पर राहा जिल्हाधिकाऱ्यांचे विभाग प्रमुखांना निर्देश

गडचिरोली, दि.18: लोकसभा सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रमांतर्गत प्रत्येक कामासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेने तत्पर राहावे व सोपविलेली जबाबदारी गांभिर्याने व काटेकोरपणे पार पाडावी असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित विभाग प्रमुखांच्या बैठकीत जिल्हाधिकारी श्री दैने बोलत होते. यावेळी सहायक जिल्हाधिकारी ओमकार पवार, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, उपविभागीय अधिकारी विवेक साळुंखे (कुरखेडा), उपवनसंरक्षक अधिकारी मिलीश शर्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, मुख्य लेखा वित्त अधिकारी हेमंत ठाकूर तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
निवडणूकीचे काम टिमवर्क ने करायचे असून कोणत्याही विभाग प्रमुखाने जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये अथवा रजेवर जावू नये असे निर्देशही श्री दैने यांनी दिले. प्रत्येकाने आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांचे वाचन करून त्यानुसारच त्याची अंमलबजावणी करावी. कार्यालय व परिसरातील विकास कामांचे भूमिपूजन फलक, कोनशीला, राजकीय व्यक्तींची छायाचित्रे व पक्षाची चिन्हे असलेले बॅनर, होर्डिंग्ज तात्काळ काढण्यात यावे. रस्ते व सावजनिक जागेवर प्रचार साहित्य लागणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी दैने यांनी दिल्या. बैठकीला विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.