जिल्हयात 84 हजार बालकांना पोलिओ डोज देण्याचे उद्दिष्ट

जिल्हयात 84 हजार बालकांना पोलिओ डोज देण्याचे उद्दिष्ट
3 मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

गडचिरोली, दि.29: पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत रविवार दिनांक 3 मार्च 2024 रोजी जिल्ह्यातील 0 ते 5 वयोगटातील 84 हजार 181 बालकांना पोलिओ डोज देण्याचे उद्दिष्ट असून यासाठी एक लाख पोलिओ डोस उपलब्ध करून घेण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी दावल साळवे यांनी आज दिली.
भारतात एकही पोलिओग्रस्त रुग्ण आढळणार नाही, याकरीता यावर्षीसुध्दा शासनातर्फे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची फेरी दिनांक 3 मार्च 2024 रोजी राबविण्यात येत आहे. या दिवशी 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना बुथवर पोलिओ लस पाजण्यात येणार आहे व 100 टक्के बालकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे.
पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत ग्रामीण भागात 2145 तर शहरी भागात 49 अशी एकूण 2194 लसीकरण केंद्रे स्थापन करण्यात करण्यात आली आहेत. या व्यतिरीक्त बसस्टॉप, रेल्वेस्टेशन, यात्रास्थळे या ठीकाणी प्रवासात असलेल्या किंवा स्थलांतरीत होत बालकांकरिता ग्रामीण भागात 111 व शहरी भागात 20 अशा एकूण 131 ट्रान्झिट टिम नियुक्त करण्यात आल्या आहेत. तसेच अस्थायी निवास असलेल्या, विटभट्टी, लहान पाडे आदि ठिकाणीसुध्दा लसीकरणासाठी 184 मोबाईल टिमची व्यवस्था करण्यात आली आहे.
पल्स पोलिओ लसीकरणापासून एकही पात्र बालक वंचित राहता कामा नये. स्थलांतरीत तसेच रस्त्यांवरील बालकांच्या लसिकरणाकडे विशेष लक्ष द्यावे. जिल्ह्यातील दुर्गम भागात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन जनजागृती करावी अशा सूचना जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी दिल्या आहेत. तर योग्य समन्वयातून लसीकरण मोहिमे 100 टक्के यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांनी केले.