मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रम उत्साहात मराठी भाषा व रोजगाराच्या संधीवर मार्गदर्शन

मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रम उत्साहात मराठी भाषा व रोजगाराच्या संधीवर मार्गदर्शन

           भंडारा, दिनांक, 27 : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय भंडाराच्यावतीने आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त अधिकारी कार्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मराठी भाषा व रोजगाराच्या संधी या विषयावर मराठी भाषा विभाग प्रमुख समर्थ महाविद्यालय, अजिंक्य भांडारकर यांनी मार्गदर्शन केले .या कार्यक्रमाला जिल्हा पुनर्वसन अधिकारी लीना फलके, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ, प्रसिद्ध कवी मनोज केवट , यासह ग्रंथालय संघाचे पदाधिकारी , कर्मचारीउपस्थित होते.

          यावेळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्या हस्ते इ-ग्रंथालय प्रकल्पांतर्गत ग्रंथांची संगणकीय तालिका तयार करणे या उपक्रमाचा शुभारंभ  मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला .यामुळे वाचकाला संदर्भ साहित्य शोधताना मदत होईल. ग्रंथालयात जलद गतीने पुस्तकाचा शोध घेता येईल यासाठी ही ग्रंथालय ग्रंथांची संगणकीकृत तालिका उपयुक्त ठरेल असे मत, श्रीमती फलके यांनी व्यक्त केले.

         रोजगाराच्या संधी यावर सविस्तर मार्गदर्शन करताना प्राध्यापक अजिंक्य भांडारकर यांनी मराठी भाषेतून शिक्षण घेऊनही भाषेमुळे रोजगाराच्या संधी   उपलब्ध होत असल्याचे सांगितले. त्यामध्ये भाषांतरकार, अनुवादक सॉफ्टवेअर किंवा आज्ञावली तयार करताना स्थानिक भाषा तज्ञांची आवश्यकता, निवेदन, सूत्रसंचालन तसेच  जाहिरात क्षेत्रातहीअनेक संधी असल्याचे त्यांनी सांगितले.

         त्यानंतर या कार्यक्रमात मनोज  केवट यांनी  वैनगंगा आणि स्व लिखित कवितांचे सुंदर सादरीकरण केले.

रोजच्या जीवन व्यवहारात मराठी भाषेचा  वापर भाषेला मजबूत  बनवतो ,असे मत जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती शैलजा वाघ यांनी व्यक्त केले.

           तर उपजिल्हाधिकारी श्रीमती फलके यांनी प्रशासन पातळीवर जिल्हा कचेरीत वाचनालयाची निर्मिती तसेच  शासकीय कार्यक्रमात पुष्पगुच्छ ऐवजी पुस्तकांची भेट यासोबतच सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी ग्रंथालय ग्रंथालयाचे सभासदत्व घेण्याबाबतच्या सूचना व एकूणच मराठी भाषा विषयक प्रशासन करत असलेल्या प्रयत्नांची माहिती यावेळेस दिली. तसेच माहेर या कवितेचे अभिवाचन केले.

         कार्यक्रमाचे ओघवते सूत्रसंचालन कविता नागापुरे तर आभार प्रदर्शन जिल्हा ग्रंथालय अधिकारी रत्नाकर नलावडे यांनी केले.