सरकारची डोळेझाक कशासाठी; ड्रग माफियांना कुणाचा आशीर्वाद?- श्री. वडेट्टीवार यांचा सवाल

विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याला ड्रग्जचा विळखा

महायुती सरकारच्या काळात ड्रग माफियांचा सुळसुळाट वाढला

विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

सरकारची डोळेझाक कशासाठी; ड्रग माफियांना कुणाचा आशीर्वाद?- श्री. वडेट्टीवार यांचा सवाल

मुंबई दि.21:- विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात 2200 कोटींचे ड्रग्ज सापडले. सरकारच्या नाकर्तेपणामुळे पुण्याला ड्रग्जचा विळखा पडला आहे. महायुती सरकारच्या काळात ड्रग माफियांचा सुळसुळाट वाढला असून सरकारची डोळेझाक कशासाठी; ड्रग माफियांना कुणाचा आशीर्वाद आहे, असा संतप्त सवाल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

श्री. वडेट्टीवार म्हणाले की, पुणे पोलिसांच्या इतिहासातील सगळ्यात मोठी  कारवाई मागील दोन दिवसांत झाली आहे. पुणे पोलिसांनी पुण्यातून जवळपास 2200 कोटींचे ड्रग्ज जप्त केले आहे. पुणे पोलिसांनी पुणे, विश्रांतवाडी, कुरकुंभ, दौंड आणि राजधानी दिल्लीमध्ये कारवाई केली. पण पुण्यातील ड्रग्जची व्यप्ती आणखी मोठी असल्याचे बोलले जात आहे. तरीही सरकार ड्रगच्या समूळ उच्चाटनासाठी धडक कारवाई करत नाही. सरकार डोळेझाक करत आहे.

राज्यातील तरुणाईला वाचविण्यासाठी ड्रग माफियांचा सरकारने वेळीच बंदोबस्त केला पाहिजे. सरकारने धडक कारवाई करून जरब बसविली पाहिजे. अन्यथा हे ड्रग माफिया तरुणाईला देशोधडीला लावतील. सरकारने याकडे डोळेझाक करू नये. ज्यांच्या आशीर्वादाने ड्रग रॅकेट सुरु आहे त्यांच्या देखील मुस्क्या सरकारने आवळल्या पाहिजेत. सरकारने ड्रग प्रकरण गांभीर्याने घेऊन दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणीही श्री. वडेट्टीवार यांनी केली आहे.