‘जाणता राजा’ महानाट्याला चंद्रपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

‘जाणता राजा’ महानाट्याला चंद्रपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्हा प्रशासनाचे उत्कृष्ट नियोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची विशेष सोय

चंद्रपूर दि.5 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून ‘जाणता राजा’ या महानाट्याचे प्रयोग राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येत आहे. चंद्रपूरमध्येही सांस्कृतिक कार्य विभाग, जिल्हा प्रशासन आणि चंद्रपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने चांदा क्लब मैदानावर आयोजित या महानाट्याने संपूर्ण जिल्हा ढवळून निघाला.

प्रत्येक जिल्ह्यात ‘जाणता राजा’ या महानाट्याचे तीन दिवस प्रयोग होत आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद पाहता, चंद्रपूर येथे एक अतिरिक्त दिवस वाढवून जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हावासियांना अनोखी भेट दिली. चार दिवसात हजारो नागरिकांनी ‘याची देही…याची डोळा’ असा छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट प्रत्यक्षात अनुभवला. जिल्हा प्रशासनाच्या उत्कृष्ट नियोजनामुळे या महानाट्याने चंद्रपूरकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

जिल्हा प्रशासन व मनपाचे उत्कृष्ट नियोजन : ‘जाणता राजा’ महानाट्य निःशुल्क असले तरी गैरसोय होऊ नये यादृष्टीने जिल्हा प्रशासन व चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे पासेस वाटण्याचे नियोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना याबाबत सुचना केल्या. तसेच मनपा मुख्य कार्यालय व प्रत्येक झोन कार्यालयात पासेस वाटपाचे काऊंटर उघडण्यात आले व तेथे जबाबदार अधिकारी नेमण्यात आले. जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये यांना कार्यक्रमास उपस्थित राहण्यास ठराविक दिवस देण्यात आला. मनपातर्फे आरोग्य विभागाचे 24 कर्मचारी शिफ्टनुसार पूर्णवेळ कार्यक्रम स्थळी उपस्थित होते. रुग्णवाहिका व अन्य प्रथमोपचाराची सोय येथे ठेवण्यात आली होती. प्रत्येक दिवसाचा प्रयोग संपताच मनपा स्वच्छता कर्मचारी 1 तासाच्या आत स्थळ स्वच्छ करीत होते. यात संपूर्ण परिसरात असलेला कचरा उचलुन स्वच्छ करणे, मोबाईल टॉयलेट स्वच्छ करणे, मोबाईल टॉयलेट टॅंक स्वच्छ राहील याची खात्री करणे, स्टेजवर सुक्ष्म कचरा राहणार नाही याची खात्री करणे इत्यादी कार्ये मनपा स्वच्छता विभागातर्फे 4 दिवस निरंतर करण्यात आली.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विशेष सोय : चंद्रपूर शहरातील चांदा क्लब येथे ‘जाणता राजा’ या महानाट्याचा प्रयोग असला तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना छत्रपती शिवरायांचा जीवनपट अनुभवता यावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने विशेष सोय केली होती. चंद्रपूर, राजुरा, गोंडपिपरी, मूल, पोंभुर्णा, भद्रावती, बल्लारपूर आणि वरोरा या आठ तालुक्यातील इयत्ता 8 वी, 9 वी आणि 11 वीच्या दररोज 2500 विद्यार्थी याप्रमाणे एकूण 7500 विद्यार्थ्यांनी प्रयोगाला हजेरी लावली. यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांची ने – आण करण्यासाठी रोज 53 बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. तर चंद्रपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून रोज 2500 विद्यार्थ्यांना नास्ता देण्यात आला.

प्रत्येक तालुक्यात 20 विद्यार्थ्यांमागे एक नियंत्रक शिक्षक / शिक्षिका यांची नियुक्ती तसेच विद्यार्थी निवड, पालक संमती आणि संपूर्ण व्यवस्थापनासाठी प्रति तालुका 5 नोडल अधिकारी शिक्षण विभागाने नियुक्त केले. याशिवाय विद्यार्थी बसमध्ये बसल्यापासून ते रात्री घरी पोहचेपर्यंत, नियंत्रणासाठी जिल्ह्यात सात सदस्यीय मॉनिटरींग कमिटी स्थापन करण्यात आली होती. रोजी सायंकाळी 4 ते 4.15 वाजता उपरोक्त तालुक्यातून विद्यार्थ्यांना घेऊन बस निघाल्यानंतर रात्री 10.30 वाजताच्या दरम्यान संबंधित तालुक्यातील मुख्याध्यापक पालकांना शाळेत बोलावून ठेवत होते. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या उत्कृष्ट नियोजनामुळे तीन दिवसात 7500 ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ‘जाणता राजा’ या महानाट्याचा प्रयोग अनुभवता आला. याबाबत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले.

जाणता राजा’ प्रयोगाला चंद्रपूरकरांचा उदंड प्रतिसाद : छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व प्रभावीपणे मांडणाऱ्या ‘जाणता राजा’ या महानाट्याला जिल्ह्याच्या विविध भागातील जनतेने मोठ्या संख्येने हजेरी लावून उदंड प्रतिसाद दिला. प्रेक्षकांची अलोट गर्दी व ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’चा गजर आसमंतात निनादला.

शिवशाहीर महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या दिग्दर्शनात ‘जाणता राजा’ नाट्यकृतीची निर्मिती झाली होती. आतापर्यंत देशात व विदेशात या महानाट्याचे शेकडो प्रयोग झाले आहेत. शिवछत्रपतींच्या पूर्वीचा महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये असलेली तत्कालीन परिस्थिती, त्यानंतर शिवरायांचा झालेला जन्म, तरुण वयात स्वराज्य स्थापनेची घेतलेली शपथ, प्रशासनावरची जरब, अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानावर केलेला हल्ला, आग्र्यावरून झालेली सुटका, शिवरायांचा राज्याभिषेक आदी विविध घटनांना उजाळा देणारे प्रसंग यामध्ये जीवंत करण्यात आले आहे. प्रभावी संवाद, भव्य फिरत्या रंगमंचावर 200 पेक्षा अधिक कलाकार व तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रसंगानुरुप उभे करण्यात आलेले देखावे, विविध परंपरा व लोककलांचे सादरीकरण, घोडे, उंट असा लवाजमा, भव्यदिव्य नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत संयोजन व उत्तम संवादफेक प्रेक्षकांना भुरळ पाडणारे होते. रोज चार दिवस तब्बल तीन तास प्रेक्षकांना महानाट्याने खिळवून ठेवले.