मुल मध्ये उभे राहणार 100 खाटांचे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे 107 कोटी 29 लक्ष मंजूर

मुल मध्ये उभे राहणार 100 खाटांचे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय

ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे 107 कोटी 29 लक्ष मंजूर

प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय जारी

चंद्रपूर, दि. 28 : जिल्ह्यात आरोग्याच्या उत्तमोत्तम सुविधा असाव्यात, येथील रुग्णांना उपचारासाठी नागपूर, मुंबईच्या चकरा माराव्या लागू नये तसेच स्थानिक स्तरावरच रुग्णांना अत्यल्प दरात आरोग्याच्या अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार नेहमीच प्रयत्नशील असतात. याच अनुषंगाने मुल येथीाल 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाचे  100 खाटांमध्ये श्रेणीवर्धन करण्यासाठी मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना यश प्राप्त झाले असून मुल येथे आता 100 खाटांचे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभे राहणार आहे. यासाठी शासनाने 107 कोटी 29 लक्ष रुपयांच्या प्रशासकीय मान्यतेला मंजुरी दिली असून तसा शासन निर्णय जारी केला आहे.

सद्यस्थितीत मूल येथील उपजिल्हा रुग्णालय 50 खाटांचे आहे. या रुग्णालयाचे 100 खाटांमध्ये श्रेणीवर्धन करण्यासाठी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे आता मुल येथे 100 खाटांचे नवीन उपजिल्हा रुग्णालय स्थापित होणार आहे. सदर रुग्णालय हे तळमजला आणि त्यावर तीन माळे असे एकूण 15 हजार चौ. मीटरवर तर वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचा-यांसाठी 4 मजली निवासस्थान राहणार आहे. तसेच 100 खाटा करिता लागणारी नवीन पदनिर्मिती या रुग्णालयासाठी करण्यात येईल. यामध्ये नेत्रतज्‍ज्ञ, बालरोगतज्‍ज्ञ, स्त्रीरोगतज्‍ज्ञ, अस्थिरोगतज्‍ज्ञ, सर्जन, भूलतज्‍ज्ञ आणि इतर वैद्यकीय अधिकारी अशी एकूण  14 वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे निर्माण होतील. सोबतच चतुर्थ श्रेणी कर्मचारी, परिचारिका, तांत्रीक पदेसुद्धा पदे निर्माण होतील.

रुग्णालयामध्ये राहणार अत्याधुनिक सोयीसुविधा : रुग्णालयामध्ये नवीन विशेषउपचार कक्ष, सर्व प्रकारच्या विशेषज्‍ज्ञ सेवा पुरविता येणे शक्य होईल. या ठिकाणी डोळ्यांच्या व अस्थिरोग शस्त्रक्रियासाठी नवीन शस्त्रक्रियागृह निर्माण करण्यात येणार आहे. नव्याने कार्यान्वित होणाऱ्या विशेष उपचार कक्षाकरिता आधुनिक  वैद्यकीय उपकरणे व यंत्रसामुग्री उपलब्ध होतील. या ठिकाणी डिजिटल सोनोग्राफी तसेच  एक्स-रे आणि सर्व प्रकारच्या प्रयोगशाळा चाचण्या होतील. सुसज्ज माता-बाळ उपचार यंत्रणा, अपघात विभागात आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व साधनसामुग्री, बाह्य रुग्ण विभागामध्ये रुग्णांचा ऑनलाईन डाटा गोळा करणे.  गंभीर शस्त्रक्रियेसाठी आय.सी.यू, मॉड्यूलर ऑपरेशन कक्ष, महिला, पुरुष व बालकांसाठी तसेच गरोदर माता व बाळंतपण झालेल्या मातांसाठी स्वतंत्र कक्ष, मॉड्यूलर औषधी वितरण कक्ष, ब्लड बँक, आयुर्वेद, युनानी व होमीओपॅथी रुग्णांच्या उपचारासाठी बाह्य व आंतररुग्ण सेवा, पिण्याचे शुध्द पाणी व स्वच्छतेच्या उपाययोजना राहणार आहे.

रुग्णांच्या नातेवाईकांसाठीसुध्दा सुविधा : रुग्णालयात रुग्णांसोबत येणा-या नातेवाईकांसाठी जेवणाची, बसण्याची व आराम करण्यासाठी सर्व सुविधायुक्त प्रतिक्षा कक्ष, नातेवाईकांसाठी स्वतंत्र शौचालय, आंघोळीकरीता बाथरुम, रुग्णांचे नातेवाईक तसेच रुग्णालयामधील अधिकारी व कर्मचा-यांसाठी स्वतंत्र वाहनतळ व्यवस्था राहणार आहे.