आदिम जमातीच्या विकासासाठी सरसावले प्रशासन

आदिम जमातीच्या विकासासाठी सरसावले प्रशासन
गडचिरोली, दि.16: विकासाच्या प्रक्रियेत नेहमी मागे असणाऱ्या आदिम समाजाच्या लोकांना न्याय देण्याच्या व त्यांना विकासाच्या गंगेत वेगाने सहभागी करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (पी. एम. जनमन अभियान) पूर्ण जिल्ह्यात सुरू आहे. सदर अभियानामार्फत भारतातील ७५ आदिम जमातीसाठी व यामध्ये समाविष्ट असलेल्या महाराष्ट्र राज्यातील तीन जमाती- कातकरी, माडिया गोंड, कोलाम यांच्यासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान उपक्रमांतर्गत नऊ शासकीय विभागांच्या अभिसरणातून 11 मूलभूत सोयी सुविधा आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक आदिम माडिया गोंड पाड्यामध्ये उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने धोरण निश्चित केले आहे. या अभियानाच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील आदिम समुदायांच्या लोकांसोबत प्रातिनिधिक स्वरूपामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला, तसेच प्रातिनिधिक स्वरूपात माडिया गोंड समुदायाच्या लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभाच्या वाटपाचे आयोजन मान्यवराच्या उपस्थितीमध्ये करण्याच्या अनुषंगाने ग्रामपंचायत पोटेगाव येथे कार्यक्रम पार पडला.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी पी.एम. जनमन अभियाना अंतर्गत समाविष्ट असलेल्या ११ योजनांची माहिती दिली. तसेच माडीया गोंड या जमातीचे जातीचे प्रमाणपत्र देताना शासनामार्फत देण्यात आलेल्या सवलती बाबत माहिती दिली. विशेष म्हणजे या आधी ही सवलत फक्त कातकरी जमातीसाठी लागू होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार अशोक नेते यांनी मार्गदर्शन केले व प्रमुख पाहुणे म्हणून आमदार देवराव होळी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी राहुल मीणा यांनी मानले. सदर कार्यक्रमात प्रधानमंत्री जनमन घरकुल योजना, आयुष्यमान भारत कार्ड, पीएम किसान कार्ड, वनधन विकास केंद्र मनरेगा अंतर्गत सिंचन विहिरी व शेततळे, बहुउद्देशीय केंद्र, आधार कार्ड यांचा लाभ प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना देण्यात आला तसेच वेगवेगळ्या विभागाचे त्यांच्या योजनांची माहिती व लाभ देण्याच्या उद्देशाने विविध स्टॉल तयार करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला व स्टॉलला मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, राजेंद्र भुयार, अतिरिक्त जिल्हाधिकारी, धनाजी पाटील, प्रकल्प संचालक जि. ग्रा. वी. यो., प्रशांत शिर्के, उपमुकाअ पंचायत, रवींद्र कणसे, प्रकल्प संचालक जल जीवन मिशन, फरेंद्र कुतीरकर, तहसीलदार, महेंद्र गणवीर, गटविकास अधिकारी सुरेंद्र गोंगले, गौरकर यांनी सहकार्य केले. असे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली श्रीमती आयुषी सिंह यांनी कळविले आहे.