जिल्हयातील महिलांचे आय आय एम ,नागपुर येथे प्रशिक्षण 

जिल्हयातील महिलांचे आय आय एम ,नागपुर येथे प्रशिक्षण 

           भंडारा, दि.13 :जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन विभाग यांच्या प्रयत्नातून भंडारा जिल्ह्यातील विविध बचत गटांच्या 75 महिलांसाठी  IIM नागपूर येथे पॅकेजिंग, ब्रॅण्डिंग, ऑनलाइन मार्केटिंग इत्यादी विषयावर एक दिवसीय कार्यशाळा शुक्रवार दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आली. यामध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महिला आर्थिक विकास महामंडळ व राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान या यंत्रणांशी संलग्नीत बचत गटांच्या महिलांचा समावेश होता.

          जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथे सकाळी 7.45 वाजता मा. जिल्हाधिकारी श्री योगेश कुंभेजकर यांनी नागपूर येथे रवाना होण्यापूर्वी सर्व महिलांशी संवाद साधून ते उत्पादित करीत असलेल्या वस्तूंच्या व्यवसाय वृद्धीकरिता IIM या मानांकित संस्थेद्वारे सर्व बाबींवर विस्तृत प्रशिक्षण घेऊन जिल्ह्यातील इतरही बचत गटांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना दिल्या.

         या प्रशिक्षणानंतर बचत गटांना त्यांचे व्यवसाय वृद्धीसाठी निश्चितच मदत होईल असा विश्वास व्यक्त करून, जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक ते सहकार्य करण्याची हमी देऊन सर्व महिलांनी प्रत्येक सूक्ष्म बाबींवर काळजीपूर्वक प्रशिक्षण घेण्याचे आवाहन केले.

         या प्रसंगी जिल्हा नियोजन अधिकारी श्री. शशीकुमार बोरकर तसेच माविम च्या जिल्हा समन्वय अधिकारी श्रीमती भोंगाडे, राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान चे जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री प्रवीण पडोळे, उमेद चे श्री पाटील व सिकॉम कन्सल्टन्ट श्री राहुल पंचभाई उपस्थित होते.

            IIM नागपूर येथे प्रत्यक्ष प्रशिक्षणावेळी, तंत्रज्ञान आणि उद्योजकता या सत्रामध्ये प्रा. गुंजन तोमर यांनी ऑनलाईन मार्केटिंग का आणि कसे करावे, तसेच हॅशटॅग चा योग्य वापर कसा करावा इत्यादी बाबींविषयी मार्गदर्शन केले. प्रा. रंजिता पी यांनी ब्रँड व्यवस्थापन या सत्रामध्ये आपल्याकडील वस्तूंच्या व पदार्थांच्या विक्रीसाठी योग्य पॅकेजिंग व ब्रॅण्डिंग ची गरज अधोरेखित करून ते कसे करावे याविषयी व्यावहारिक उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले.

           त्याचप्रमाणे लहान व्यवसायांचे व्यवस्थापन या सत्रामध्ये प्रा. निकुंज जैन यांनी व्यवस्थापनाच्या विविध मॉडेल्स ची तयारी महिलांना विविध सांघिक कार्य देऊन त्याच्या विश्लेषणाद्वारे करून घेतली.

         समारोप प्रसंगी IIM च्या कार्यकारी शिक्षण विभागाचे प्रमुख श्री मुकुंद व्यास तसेच भंडारा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्री विवेक बोन्द्रे उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित सर्व महिलांना IIM तर्फे प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.

         या प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रशासनातर्फे मुख्यमंत्री फेलो निलेश साळुंके तर IIM तर्फे प्रा. गुंजन तोमर यांनी विशेष प्रयत्न केले.